जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ८० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत.
रेणुकाई पिंपळगाव येथील बाजारपेठेतमिरचीची मोठी आवक झाल्याने २० ते ३० रुपये प्रतिकिलोने मिरची विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सुरुवातीला १० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले होते. त्यापाठोपाठ ९ ते १० हजारांपर्यंत भाव खाली आले. परंतु, शनिवारी हे भाव तर २ ते ३ हजारांवर आल्याने शेतकऱ्यांचा फवारणी, निंदणीसह तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. यात रिमझिम पावसाचाही फटका बसत आहे.
यंदा तालुक्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारात सर्वाधिक हिरवी मिरची दाखल झाली आहे. एका शेतकऱ्याला एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च लागला आहे. एप्रिलपासून मिरचीचा दुसरा तोडा तोडणे सुरू आहे. सुरुवातीला काळी मिरचीला ११० रुपये किलो दर होता. आता ही मिरची ३० रुपये किलोने विक्री होत आहे. सुरुवातीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते.
परंतु, शनिवारी अचानक भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर पसरला आहे. दरम्यान, मिरचीचे दर असेच कमी राहिले तर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी मिरचीचे दर वाढावेत, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
उत्पादक शेतकरी तोट्यात
सध्या बाजारपेठेत मिरचीची आवक वाढल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. विक्री न झाल्यास व्यापारी मागेल त्या भावात द्यावा लागत आहे. - माणिक तांगडे, मिरची उत्पादक शेतकरी.
भावामध्ये चढ-उतार सुरूच
या आठवड्यात उन्हाळी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भावामध्ये चढ- उतार होत आहे. बाजारपेठ परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे मिरचीचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यात मिरचीला चांगला दर मिळाला होता. - भगवान तांगडे, व्यापारी, वडोद तांगडा.
बाजारपेठेत शनिवारचे ठोक मिरचीचे भाव
काळी मिरची | २५ ते ३० रुपये |
ज्वेलरी | २० ते २५ रुपये |
शिमला | २० ते २२ रुपये |
पिकेडोर | १५ ते २० रुपये |
बाजारपेठेत आवक वाढल्याने दर घसरले
चांगला भाव मिळतो, म्हणून मे महिन्यात काही शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून मिरचीची लागवड केली. परंतु, सध्या भोकरदन तालुक्यासह इतर भागांत मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे धावडा, रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचप्रमाणे रिमझिम पाऊस अन् ढगाळ वातावरणाचा फटका बसला आहे. त्यामुळे दरवाढीची अनेकांना प्रतीक्षा आहे.