यंदा चांगले उत्पादन होऊनही हिरव्या मिरचीला (Green Chilli) बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल आहे. मिरची उत्पादनात अपेक्षित वृद्धी होऊनही बाजारात कमी मागणी आणि किमतीच्या दबावामुळे शेतकऱ्यांचा रोजगार व उत्पादन खर्च परत मिळविणे कठीण बनले आहे.
हिरव्या मिरचीच्या पिकासाठी लागवडीचा (Cultivation) खर्च या वर्षी जास्त आला आहे. शेतकऱ्यांना सिंचन, औषधांचा वापर, खत आणि लागवडीचे इतर खर्च वाढले आहेत. याव्यतिरिक्त मिरचीचे पीक (Crop) वेळेवर काढणी आणि योग्यप्रकारे जतन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे खर्च आणखी वाढतो.
हिरव्या मिरचीला ठोक बाजारात १६ रुपये किलो दर मिळत आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी ४०-४५ रुपये किलो दर मिळाला होता. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे.
असा येतोय खर्च
मिरची पिकाला खर्च ३,५०,००० रुपये लागवड, फवारणी, खत व्यवस्थापन
३० रुपये प्रति पोतडी वाहतूक खर्च
५ रुपये प्रति किलो तोडणी खर्च
अकोला, खामगाव बाजारात विक्री
खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांतील मिरची उत्पादक शेतकरी अकोला आणि खामगाव येथील बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी घेऊन जातात.
खामगाव येथे खरेदीदार व्यापारी जास्त नसल्याने त्यांची अकोला बाजाराला पसंती असते. मात्र, यंदा दर कमी मिळत असल्याने शेतकरी नाराज आहे.
शासनाची मदत कशी मिळविता येईल?
* शेतकऱ्यांनी शासनाकडे विविध प्रकारच्या मदतीसाठी मागणी केली आहे.
* सरकारने त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत देण्यासाठी विविध धोरणे तयार करावीत.
* याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना मार्केटिंग (Marketing) आणि मूल्यवर्धनासाठी प्रशिक्षण देणे व बाजारपेठेतील असंतुलन दूर करण्यासाठी उपाय शोधणे आवश्यक आहे.
आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र, बाजारात चांगला दर मिळत नाही. यामुळे सध्या आम्हाला उत्पादन खर्चही परत मिळत नाही. कष्टांना योग्य मूल्य मिळायला हवे. सद्यस्थितीत बाजारात १६ ते १७ रुपये किलो भावाने मिरची खरेदी केली जात आहे. - यश हागे, शेतकरी