श्यामकुमार पुरे
'बुलढाणा' नावाने विकल्या जाणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील तेजाफोर, तेजस्विनी, शार्कवन या हिरव्या मिरचीला मागणी नसल्याने दरांमध्ये ६० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
सिल्लोड तालुक्यात मका, कापूस व त्यानंतर नगदी पीक म्हणून हिरवी मिरचीचे उत्पादन घेतल्या जाते. मागील वर्षी मिरची केवळ ४ हजार हेक्टरवर लावण्यात आली होती. यावर्षी दुपटीने वाढ होऊन तिची ८ हजार १५७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील गोळेगाव, आमठाणा, जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, पिंपळगाव येथे मिरचीचा मोठा बाजार भरतो.
दररोज सायंकाळी ५ वाजता लिलाव पद्धतीने मिरची विकल्या जाते. ही मिरची खरेदी करण्यासाठी जळगाव, सुरत, गुजरात, खान्देश, विदर्भातून व्यापारी येतात. याशिवाय शिवना, गोळेगाव व आसपासच्या तालुक्यातील जवळपास १५ व्यापारी बोली पद्धतीने मिरचीची खरेदी करतात.
रविवारी गोळेगाव येथील बाजारात ६ हजार पोते मिरचीची आवक झाली होती. (एका पोत्यात ६० किलो मिरची बसते). त्याचप्रमाणे पिंपळगाव येथील बाजारात ४ हजार, आमठाणा येथील बाजारात ४ हजार, भराडी येथे २ हजार, शिवना येथे २ हजार, जाफराबाद येथे २ हजार, भोकरदन येथे २ हजार अशी एकाच दिवशी रविवारी विविध बाजारात २० हजार पोत्यांची म्हणजेच १२ लाख क्विंटल मिरचीची आवक झाली होती.
यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मागील आठवड्यात मिर्चीला १० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. या आठवड्यात भावात कमालीची घसरण झाली. हा दर प्रति क्विंटल ३ हजार ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत आला आहे.
याशिवाय पिकाडोर, बळीराजा या मिरचीला कमी भाव आहे. ही मिर्ची २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल विकल्या गेली सिललोड तालुक्यातील शेतकरी ट्रॅक्टर, अॅपेरिक्षा, टेम्पोमध्ये मिरची आणतात. त्यानंतर या वाहनातील मिरचीचा जागेवरच लिलाव होतो.
देश-विदेशात निर्यात
विविध भागातून आलेले व्यापारी स्थानिक बाजारात मिरची खरेदी करून ती मुंबई, पुणे, कलकत्ता, नागपूर, गुजरात, सुरत, तसेच विदेशातील दुबई, ओमान आदी ठिकाणी पाठवतात. तेथून या मिरचीला मागणी नसल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
तोडणी खर्च वाढला
शेती कामासाठी मजूर मिळत नाही म्हणून तीन ते चार रुपये किलो मजुरीने तोडली जाणारी मिर्ची आता मजूर १३ रुपये किलोने तोडत आहेत. औषधी खर्च व मजुरी याचा हिशोब लावला तर यावर्षी शेतकरी म्हणावा तसा खूश दिसत नाही; मात्र भाव टिकून राहिले तर पुढे कमाई होईल, या आशेवर अजून तरी शेतकरी दिसत आहेत.
येत्या दहा दिवसांत भाव वाढतील
स्थनिक बाजारात मुबलक मिरची उपलब्ध असल्याने सध्या मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशात मागणी नाही. शिवाय व्हायरसमुळे मिरचीचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे भाव गडगडले आहेत. येत्या १० दिवसांत मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशात मागणी वाढेल व दर्जा सुधारला तर दरांमध्ये वाढही होईल. - मुक्ताराम गव्हाणे, मिरची व्यापारी, गोळेगाव.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी