शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी चांगलाच संकटात सापडला असून, बाजारात हिरव्या मिरचीला किरकोळ विक्रीत २० रुपयांचा भाव मिळत आहे. परिणामी, हिरव्या मिरच्यांनी तोड्याअभावी झाडावरच नांगी टाकल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हीच स्थिती लाल मिरचीच्या बाबतीतही दिसून येत आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर २५० ते ३०० रुपयांपर्यंत कडाडणारी लाल मिरची यंदा १५० रुपयांपर्यंत खाली घसरली आहे. पडलेल्या बाजारभावाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, गतवर्षी मिरचीला चांगला भाव मिळाला. प्रतिक्विंटल तीस हजार रुपयांपर्यंत भाव होता. उत्पादन अल्प झालं होतं; मात्र वाढलेल्या बाजारभावाने शेतकरी फायद्यात राहिले.
मिरचीला मिळालेला योग्य भाव बघता यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात मिरचीचा पेरा वाढला. तुलनेत उत्पादन मोठे झाले; मात्र बाजारभाव कोसळला. हिरव्या मिरचीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.
खर्च लाखाचा, उत्पन्न मात्र अत्यल्प
■ मिरची लागवडीसाठी एका एकराला साधारणतः एक लाखावर खर्च अपेक्षित असतो; परंतु सध्या पडलेल्या मायामुळे मिरची लागवडीसाठी साचलेला खर्चही निघेनासा झाला आहे, अशी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.
■ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. परिणामी, पुढील वर्षी पेरा कमी होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.
मजुराच्या रोजगाराला फटका
सध्या शेतशिवारात मिरची तोडणीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत मजूर मिरची तोडतात. यातून त्यांना दोनशे ते तीनशे रुपये मजुरी मिळत असते. मिरचीमुळे स्थानिक मजुरांच्या हातांना रोजगार मिळतो; परंतु भाव गडगडल्याने स्थानिक मजुरांच्या रोजगारावर परिणाम जाणवत आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आर्थिक खर्च परवडणारा नसल्याने तोडणी बंद केली आहे.
मिरचीच्या भावात गत काही दिवसांत चांगलीच घसरण झाली आहे. उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्याने तोडणीही परवडणारी नाही. त्यामुळे हिरव्या मिरचीची तोडणी थांबविली आहे. - जगन्नाथ कळसकार, मिरची उत्पादक शेतकरी, खामगाव
हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च