पुणे : महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डात भुसार बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते.
मात्र यंदा साबुदाण्याचे दर स्थिर असून, शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलोमागे चार ते सात रुपयांनी वाढले आहेत.
मागील वर्षीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांना उपवास करणेही परवडेनासे झाले आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सवातील उपवास आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला असला तरी भाविक उपवास करून नवरात्रोत्स साजरा करणार.
येथून होतेय आवक
■ भगर : तमिळनाडू, कर्नाटक आणि विदर्भातून काही भागांतून होते, तर नाशिक मध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून मार्केटयार्डात आवक होते.
■ साबुदाणा : तमिळनाडूतील सेलम जिल्ह्यातून, तर महाराष्ट्रातील नाशिक येथून.
■ शेंगदाणा : कर्नाटक, गुजरात
असे आहेत दर (प्रतिकिलो)
प्रकार | रुपये |
साबुदाणा | ₹७२ ते ७६ |
भगर | ₹१०५ ते ११० |
शेंगदाणे | ₹११० ते १२० |
गुजरातसह विविध ठिकाणी पाऊस पडल्याने बाजारात आवक काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे सध्या शेंगदाण्याचे सदर तेजीत असून किलो मागे ४ ते ७ वाढले आहेत. दिवाळीत आवक वाढली, तरी नवीन उत्पादन येणार असल्याने भावात घसरण होण्यास सुरुवात होईल. - गणेश चोरडिया, व्यापारी, मार्केटयार्ड.
दररोज १५० ते २०० टनाची आवक
■ नवरात्रोत्सवामुळे भुसार बाजारात दररोज १५० ते २०० टन साबुदाण्याची आवक होत आहे.
■ मागील वर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात साबुदाण्याचे भाव स्थिर आहेत.
■ बाजारात भगरीची १०० ते १५० टन आवक होत आहे, तर शेंगदाण्याची ९० ते १२० टन आवक होत आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसार बाजारात दररोज १५० ते २०० टन साबुदाण्याची आवक होत आहे. नेहमीच्या तुलनेत ही चांगली आवक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात साबुदाण्याचे भाव स्थिर आहेत, तर शेगदाणे व भगरमध्ये प्रतवारीनुसार ३ ते ७ रुपयांनी प्रतिकिलो वाढ झाली आहे. - अशोक लोढा, व्यापारी.
हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी