कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचीआवक चांगली असली तरी दर तेजीत आहेत. गुळाचा दर प्रतिक्विंटल ४७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
गुळाची आवक चांगली असून, दरही गेल्या वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी आहेत. गेल्या हंगामात १ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत ६ लाख ९२ हजार ८७३ गूळ रव्यांची आवक झाली आहे.
तर, या हंगामात आतापर्यंत ७ लाख २२ हजार ४६६ रव्यांची आवक झाली असून, गेल्या हंगामापेक्षा २९ हजार ५९३ गूळ रव्यांची आवक जास्त आहे.
शनिवारी गुळाचा मुहूर्तावर सौदा
बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये शनिवारी (दि. २) बलिप्रतिपदा दीपावली पाडव्यानिमित्त सकाळी साडेनऊ वाजता शेतकरी सेवा अडत दुकानात गुळाचा मुहूर्तावर सौदा काढण्यात येणार आहे. तरी, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल-तोलाईदारांसह संबंधित घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी केले.
साखर हंगाम लांबल्याने गुऱ्हाळ जोमात
■ यंदा १५ नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे गुऱ्हाळघरे जोमात सुरू आहेत.
■ गेल्या तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांशी गुऱ्हाळघरे सुरू आहे.