Halad Bajar Bhav :
वाशिम : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुलनेत रिसोडच्या बाजार समितीमध्ये कान्डी आणि गटू या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या हळदीला अधिक दर मिळत असल्याचे दिसत आहे. यामुळे फायदा होत असल्याने रिसोडमध्ये हळद विक्री करण्यावर शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे.
वाशिम अणि रिसोड या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आठवड्यातून ठरावीक एका दिवशी हळदीची खरेदी केली जाते. त्यानुसार, वाशिममध्ये १९ ऑक्टोबर रोजी कान्डी हळदीची ११ हजार २५० ते १२ हजार ९२५; तर गटू हळदीची १० हजार १०० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली.त्याच्या पाच दिवसानंतर, २४ ऑक्टोबर रोजी रिसोड येथे कान्डी हळदीला १२ हजार ५३० ते १३ हजार ७५० रुपये आणि गटू हळदीला ११ हजार ९९० ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दरातील ही तफावत अनुक्रमे १२८० आणि १८९० रुपये इतकी आहे. तथापि, एकाच जिल्ह्यातील दोन बाजार समित्यांमध्ये दरात इतकी तफावत का, असा सवाल हळद उत्पादक शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
अधिक दर, आवकही अधिक
वाशिममध्ये १९ ऑक्टोबर हळदीची खरेदी करण्यात आली. १७५० क्विंटल इतकी आवक झाली होती. मात्र, रिसोडच्या बाजार समितीमध्ये अधिक दर मिळत असल्याने २४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७५० क्विंटलची आवक नोंदविण्यात आली.
रिसोड तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून हळदीचे विक्रमी उत्पन्न घेतले जात आहे. बाजार समितीमध्ये आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी हळदीची खरेदी करून घेतली जाते. दर चांगला दिला जात असल्याने आवकही अधिक होत आहे. - विष्णुपंत भुतेकर, सभापती, कृऊबास, रिसोड