वाशिम : पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचा (Halad) हंगाम सुरू झाला असताना या शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली होती. मागील शुक्रवारी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल १० हजार ३२५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला.
शुक्रवारी (२१ मार्च) रोजी वाशिम बाजार समितीत हळदीला १३ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला. त्यामुळे हळद (Halad) उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र आणि तेलंगणासह प्रमुख हळद उत्पादक राज्यांमध्ये सध्या हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे.
विशेषतः तेलंगणातील हंगाम शिगेला पोहोचल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर हळद (Halad) दाखल होत आहे. याचा परिणाम हळदीच्या दरांवर होत असल्याचे दिसत होते. त्यातच गेल्या आठवड्यात, जिल्ह्यात हळदीचे दर १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले.
रिसोड बाजार समितीत १५ दिवसांपूर्वी हळदीला कमाल १२ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. त्यानंतर वाशिम बाजार समितीत शनिवार १५ मार्चला कमाल १० हजार ३२५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला. त्यामुळे हळद (Halad) उत्पादकांत निराशेचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी वाशिम बाजार समितीत मात्र हळदीला कमाल १३ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचे दर मिळाले.
गेल्या आठवड्यात मिळालेले दर
हळदीचा प्रकार | किमान दर | कमाल दर |
कांडी हळद | १०३२५ | १३०००-११६०० |
गहू हळद | ९५०० | १२,०००-१०,७५० |
आठवडाभरात १७०० रुपयांची वाढ
मागील आठवड्यात वाशिममध्ये हळदीला कमाल १० हजार ३२५ रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळाला, तर शुक्रवारी वाशिममध्ये हळदीला कमान १३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. अर्थात आठवडाभरात हळदीचे दर क्विंटलमागे १ हजार ७०० रुपयांनी वाढले आहेत.
७०० क्विंटल बाजारात आवक
* जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील हळदीची काढणी वेगात सुरू आहे. काढणीनंतर प्रक्रिया करून शेतकरी बाजारात हळदीची विक्री करीत आहेत. त्यामुळे या शेतमालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे.
* गेल्या आठवड्यात वाशिमच्या बाजारात ७०० क्विंटल हळदीची आवक झाली होती.