जामखेड : यंदा खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मूग उत्पादन चांगले निघाले. मात्र, शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कवडीमोल दराने मालाची विक्री केली.
शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचा प्रस्ताव जामखेडबाजार समितीने मार्केटिंग फेडरेशन पाठवून दोन महिने झाली. त्यांच्या मागणीनुसार महिन्यापूर्वी दहा लाख रुपये बाजार समितीने डिपॉझिट रक्कम जमा करूनही अद्याप आयडी न मिळाल्याने खरेदी केंद्र चालू होईना.
याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी अहिल्यानगर यांच्याशी संपर्क केला असता बाजार समितीचा प्रस्ताव नाकारण्यात आला असून, खर्डा येथील एका संस्थेला देण्यात आले आहे. खर्डा केंद्राला मंगळवारपर्यंत आयडी मिळेल, असे त्यांनी सांगितले.
शासनाने १५ नोव्हेंबर ही ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांना नोंद करण्याची तारीख दिली आहे. हमीभाव खरेदी केंद्र तालुक्यात न मिळता सरकारची भूमिका अडेलतट्टूची असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम १०० टक्के यशस्वी झाला. पिके जोमात आली. एकरी उतार चांगला पडला. दिवाळी गोड होईल व रब्बी हंगाम जोरात करता येईल, या आशेवर शेतकरी होता.
सरकारने शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मूग ८९८२ रुपये, उडीद ७४०० रुपये, सोयाबीन ४८९२ रुपये प्रतिक्विंटल असा जाहीर केला आहे. या दरावर शेतकरी खूश होता.
बाजार समितीने शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने विकला जाऊ नये यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्यासाठी ५ सप्टेंबरला जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु, कासवगतीने निर्णय प्रक्रिया होत आहे.
मार्केटिंग फेडरेशनने बाजार समितीला दहा लाख रुपये डिपॉझिट रक्कम मागितली होती. ९ ऑक्टोबरला ती रक्कम धनादेशाद्वारे जमा करण्यात आली. तरीही मार्केटिंग फेडरेशनने बाजार समितीला आयडी देण्यास चालढकल केली.
मार्केटिंग फेडरेशनने आयडी मिळेपर्यंत बाजार समितीला शेतकऱ्यांच्या मालाची ऑफलाइन नोंद चालू ठेवा, असे सांगितले. त्यानुसार बाजार समितीने एक हजारच्या आसपास शेतकऱ्यांच्या मालाची ऑफलाइन नोंदी केली.
परंतु, तरीही खरेदी केंद्र चालू होईना. त्यामुळे शेतकऱ्यांनी चारचाकी वाहनाद्वारे बाजार समितीच्या अडतीवर सोयाबीन, उडीद व मूग विक्रीसाठी आणला.
अडत व्यापारी लिलावात सोयाबीन ३६०० ते ४१०० रुपये, उडीद ५००० ते ६२०० रुपये, मूग ५५०० ते ७२०० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहेत. तर रस्त्यावर असणारे दुकानदार व्यापाऱ्यांपेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांचा माल विकत घेत आहेत.
जामखेड बाजार समितीच्या हमीभाव खरेदी केंद्रासाठी दहा लाख रुपये डिपॉझिट जमा आहे. जिल्ह्यात २५ हमीभाव खरेदी केंद्रे चालू आहेत. अल्प प्रतिसाद मिळणाऱ्या दोनच बाजार समिती आहेत. त्या दरवर्षी केंद्र चालू करतात. जामखेड बाजार समितीचा खरेदी केंद्राचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. खर्डा येथे एका संस्थेला मंजुरी मिळाली आहे. ते मंगळवारी चालू होईल. - आय. आर. पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अहिल्यानगर
शेतकऱ्यांची प्रतिनिधी म्हणून बाजार समिती कार्य करत आहे. शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने विक्री होऊ नये म्हणून दोन महिन्यांपासून बाजार समितीने मार्केटिंग फेडरेशनकडे हमीभाव खरेदी केंद्राचा प्रस्ताव दाखल केला आहे. मार्केटिंग फेडरेशनने प्रस्ताव नाकारला. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागण्यात येईल. - कैलास वराट, उपसभापती, बाजार समिती, जामखेड