रत्नागिरी : हवामानातील बदलाचा फटका जिल्ह्यातील आंबा पिकाला बसला असल्याने यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे.
विविध संकटांवर मात करत तयार झालेला आंबा बागायतदारांनी वाशी (नवी मुंबई) येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे.
त्यात सध्या सर्वाधिक वर्चस्व देवगड हापूसचे आहे. सोमवारी वाशी बाजारपेठेत ७०० आंबा पेट्या विक्रीला पाठविण्यात आल्या, त्यात एक टक्का रत्नागिरी हापूस आणि उर्वरित देवगड हापूस होता.
लांबलेला पावसाळा, नर मोहोर, तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव अशा विविध संकटातून वाचलेला व तयार झालेला हापूस बाजारात येऊ लागला आहे. वाशी बाजारपेठेत सोमवारी ७०० पेट्या विक्रीला आल्या होत्या.
त्यामध्ये रत्नागिरी हापूसचे प्रमाण अवघे एक टक्काच होते. उर्वरित सर्व आंबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठविण्यात आला होता. सध्या पेटीला आठ ते दहा हजार रुपये दर देण्यात येत आहे.
रत्नागिरी हापूस हंगाम दि. १५ मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हापूसची आवक वाढण्याची शक्यता आहे. दि. १५ मार्चपासून दि. १० ते १५ मेपर्यंत हा हंगाम चालण्याची शक्यता आहे. त्यावेळी बाजारात रत्नागिरी हापूसचे प्रमाण अधिक असेल, असा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा पीक वाचविण्यास यश आले असल्याने देवगड बाजारात हापूसचेच वर्चस्व आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात दरामध्ये थोडीफार घसरण झाली आहे.
अधिक वाचा: Strawberry Bajar Bhav : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नंबर एक; कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर