नामदेव मोरे
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढू लागली आहे. यावर्षीही हापूसला विदेशातून मागणी वाढत आहे. आखाती देशांमध्ये प्रतिदिन ८ ते ९ हजार पेट्यांची निर्यात होऊ लागली आहे.
मार्चअखेरीस युरोपलाही आंबा पोहचणार असून, अमेरिकेसह जवळपास ५० देशांमधील नागरिकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.
कोकणासह दक्षिणेकडील राज्यांमधून मुंबईत आंब्याची आवक होत आहे. प्रतिदिन २० हजार पेठ्यांपेक्षा जास्त आवक होत आहे. यामध्ये कोकणातील हापूसचा सर्वांत मोठा वाटा आहे.
- हंगामाच्या सुरुवातीलाच विदेशातूनही मागणी वाढत आहे. सद्यःस्थितीमध्ये आखाती देशामध्ये नियमित निर्यात सुरू आहे.
- मुंबईतून रोज ८ ते ९ हजार पेट्यांची निर्यात सुरू आहे. पुढील काही दिवसांमध्ये युरोपीय देश व अमेरिकेमध्येही आंबा निर्यात केला जाणार आहे. निर्यात सुलभ व्हावी यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने आंबा पिकविण्याची यंत्रणा उपलब्ध केली आहे.
- महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नवी मुबईमध्ये विकिरण केंद्र सुरू केले आहे. अमेरिकेला आंबा पाठविण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाची पूर्ण करण्यासाठीचीही यंत्रणाही पणन मंडळाच्या केंदामध्ये उपलब्ध आहे.
५० देशांमध्ये भारतीय आंबा
मुंबईमधून हवाई व सागरी मार्गाने आंब्याची निर्यात होत आहे. यावर्षीही ४० ते ५० देशांमधील नागरिकांना भारतीय आंब्याची चव घेता येणार आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, निर्यातीला सुरुवात झाली असून, एप्रिल व मेमध्ये निर्यातीचा टक्काही वाढणार आहे.
आंबा निर्यात होणारे प्रमुख देश
यूएई, यूके, यूएसए, कतार, कुवेत, ओमन, कॅनडा, सिंगापूर, बहरीन, भुतान, सौदी अरब, नेपाळ, जर्मनी, मालदीव, न्यूझीलंड, जपान, ऑस्ट्रेलिया.
तीन वर्षातील आंबा निर्यातीचा तपशील
वर्ष | निर्यात (टन) | उलाढाल (कोटी) |
२०२०-२१ | २१०३३ | २७१ |
२०२१-२२ | २७८७२ | ३२७ |
२०२२-२३ | २२९६ | ३७८ |