नवी मुंबई : कोकणच्या हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. जुन्नर आंबेगावमधील हापूसचा हंगाम सुरू झाला असून २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे.
बाजार समितीमध्ये १५ जूननंतर उत्तर प्रदेशमधील लंगडा, दशेरी आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे जुलैमध्ये ही ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.
कोकणच्या हापूसचा हंगाम संपत आल्यानंतर जुन्नर, आंबेगाव परिसरातील आंब्याची मार्केटमध्ये आवक सुरू होत असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, बाणकोट परिसरातील हापूसचा हंगाम संपुष्टात आला आहे. गुजरातमधील हंगामही दोन दिवसांत संपुष्टात येणार आहे.
सोमवारी बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांतून १२ हजार व इतर राज्यांमधून १३,९३१ पेट्यांची आवक झाली आहे. जुन्नर, आंबेगाव परिसरातील हापूसचा हंगाम सुरू झाला आहे.
प्रतिदिन जवळपास १० हजार पेट्यांची आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये जुन्नर हापूसला २०० ते ५०० रुपये डझन एवढा दर मिळत आहे. २० जूनपर्यंत हा हंगाम सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
जीआय मानांकनासाठी पाठपुरावा
- भीमाशंकरच्या पट्ट्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यामधील आंबा प्रत्येक वर्षी जूनमध्ये मार्केटमध्ये येतो. या परिसरातील आंब्याचे उत्पादन वाढत असून प्रत्येक वर्षी ५ हजारांपेक्षा जास्त रोपांची लागवड होऊ लागली आहे.
- शिवकाळापासून हा आंबा प्रसिद्ध असल्यामुळे त्याला शिवनेरी आंबा नावाने जीआय मानांकन मिळावे यासाठी शेतकरी व लोकप्रतिनिधी अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत.
बाजार समितीमध्ये जुन्नर, आंबेगाव परिसरातून प्रतिदिन १० हजार पेट्यांची आवक सुरू झाली आहे. हा हंगाम २० जूनपर्यंत सुरू राहील. यानंतर उत्तर प्रदेशमधील आंब्याची आवक सुरू होईल. - संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट
अधिक वाचा: Tur Variety राहुरी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेला नवीन तुरीचा वाण देतोय भरघोस उत्पादन