नामदेव मोरे
नवी मुंबई : दरवर्षी फेब्रुवारी ते जून ५ महिने आंब्याचे फळबाजारावर वर्चस्व असते; परंतु यावर्षी खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, आवक घटली आहे.
यंदा कोकणच्या हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल ते १० मे, अशी ४० दिवस राहणार आहे. गुजरात व दक्षिणेकडील राज्यांतही उत्पादन कमी झाल्याने यावर्षी ग्राहकांना कमी प्रमाणात आंबा उपलब्ध होणार असून, भावही तेजीत राहतील.
गतवर्षी फेब्रुवारीपासून आंब्याची मोठी आवक सुरू झाली होती; परंतु यावर्षी फेब्रुवारीमध्ये गतवर्षीपेक्षा ५८३ टन कमी आवक झाली आहे. गतवर्षी मार्चच्या सुरुवातीला सरासरी ४० हजार पेट्यांची आवक होत होती.
यावर्षी २० ते २५ हजार पेट्यांचीच आवक होत आहे. यावर्षी १ एप्रिलपासून हापूस, बदामी, लालबाग, राजापुरी, केसरची आवक होईल, तर एप्रिलनंतर जुन्नर हापूसची आणि २५ जूननंतर दशेरी लंगडाची आवक होईल.
प्रतिडझन हापूसचे दर
वर्ष | होलसेल | किरकोळ |
२०२४ | २००-१,००० | २००-१,००० |
२०२५ | ३००-१,४०० | ७००-२,००० |
आवक ४० टक्क्यांनी कमी
आंध्र प्रदेश, कर्नाटक व केरळमध्ये उत्पादन कमी आहे. गुजरातमध्येही अशीच स्थिती आहे. यावर्षीचा हंगाम गतवर्षीपेक्षा ३० ते ४० टक्के कमी राहण्याची शक्यता आहे.
गतवर्षी फेब्रुवारीपासून आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. यावर्षी खराब हवामानामुळे आवक घटली आहे. हापूसची सर्वाधिक आवक १ एप्रिल ते १० मेदरम्यान राहील. दक्षिणेतील आंब्याची आवकही कमी होण्याची शक्यता आहे. - संजय पानसरे, संचालक
अधिक वाचा: नोकरी अन् व्यवसायापेक्षाही अधिक नफा कमवून देतेय फौजींची शेती; १ एकर कलिंगडातून ३ लाखांची कमाई