Harbhara Market : रब्बी हंगामात सुमारे सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची(Harbhara Crop) पेरणी झाली. मात्र, फारशी कडाक्याची थंडी नसल्याने पिकाची पुरेशी वाढ होऊ शकली नव्हती. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला. (Harbhara Market )
एकरी पाच ते सहा क्विंटलही उतार येत नसल्याचे शेतकरी सांगताहेत. हे थोड़के म्हणून की ५,७०० काय, बाजारपेठेत दरामध्येही मोठी घसरण झाली आहे.(Harbhara Market )
५,७०० रुपये शासनाचा हमीभाव असताना सध्या ४,९०० ते ५,१०० रूपये दराने खरेदी करून शेतकऱ्यांची खुलेआम लूट केली जात आहे. असे असतानाही सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.(Harbhara Market )
५,७०० रूपये हमीभाव जाहीर
* गतवर्षी सततच्या पावसामुळे रब्बी हंगामाची पेरणी लांबणीवर पडली होती. ज्वारीच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर भर दिला. जिल्ह्याचे या पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८० हजार ९०० हेक्टर इतके आहे.
* प्रत्यक्ष पेरणी २ लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १२४ टक्के पेरणी झाली. हे पीक ऐन वाढीच्या अवस्थेत असतानाच थंडीचा जोर ओसरला होता. त्यामुळे हरभऱ्याची अपेक्षित वाढ झालेली नव्हती. याचा फटका उत्पादकतेला बसला.
* एकरी पाच ते सहा क्विंटलही उतार येत नसल्याचे हरभरा उत्पादक शेतकरी सांगताहेत. असे असतानाच दुसरीकडे दरामध्येही प्रचंड घसरण झाली आहे. सध्या हमीभावापेक्षा सातशे ते आठशे रूपये कमी दराने व्यापाऱ्यांकडून हरभरा खरेदी केला जात आहे.
* ४,९०० ते ५,१०० रूपये एवढा अल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा हमीभाव खरेदी केंद्राकडे लागल्या आहेत. मात्र, शासनस्तरावरून तुर्तास तरी हालचाली दिसत नाहीत.
* अद्याप मार्केटिंग फेडरेशनला कुल्याही स्वरूपाच्या सूचना वा पत्रव्यवहारही झालेला नाही. एकीकडे शेतकऱ्यांची लूट सुरू असतानाच दुसरीकडे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधीही याबाबतीत गप्पच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पाऊण एकर क्षेत्रात हरभरा पीक होते. केवळ ६ कट्टे म्हणजे, तीन क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन झाले. बाजारपेठेत ५ हजार १०० रूपये दराने १५ हजार ३०० रूपये हाती पडले. बियाणे, खत, पेरणी, खुरपणी, किटकनाशकांची फवारणी, काढणी आणि मळणी मिळून सुमारे तेरा हजारांहून अधिक खर्च आला आहे. वाहतूक खर्च वजा जाता हाती पंधराशे रूपये उरले. मायबाप सरकारने सांगावे आम्ही शेती करावी तरी कशी? कुटुंबांचा गाडा हाकावा तरी कसा? - सुनील खरबडे, हरभरा उत्पादक शेतकरी.
चार पैसे हाती उरतील, या अपेक्षेने नगदी पीक असलेल्या हरभरा पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला. परंतु, हरभरा बाजारपेठेत येताच दरात प्रचंड घसरण झाली. हमीभावापेक्षा ६०० ते ७०० रूपये कमी दर मिळत आहे. मात्र, अद्याप हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला जाग येणार तरी कधी? - ॲड. पंकज चव्हाण, पारगाव.
शासनाला देणंघेणं नाही
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. असे असतानाही अद्याप हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या अनुषंगाने काहीच हालचाली नाहीत. असे असेल तर हे सरकार शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे माल घातल्यानंतर केंद्र सुरू करणार का? शासनाला शेतकऱ्यांचे काहीही देणंघेणं उरलेलं नाही. निवडणुकीवेळीच त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा येतो. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने खरेदी केंद्र सुरू करावीत. अन्यथा तीव्र आंदोलन करू. - संजय पाटील दुधगावकर, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.
हरभऱ्याच्या क्षेत्रावर दृष्टिक्षेप
सर्वसाधारण क्षेत्र (हे.) १,८०,९००
प्रत्यक्ष पेरणी झाली २,२६,०००
पेरणीचे प्रमाण १२४%
तालुकानिहाय हरभऱ्याखालील क्षेत्र
तालुका | क्षेत्र (सर्व आकडे हेक्टरमध्ये) |
धाराशिव | १६६००० |
तुळजापूर | ८४९०० |
परंडा | ४१३०० |
भूम | ४६५०० |
कळंब | ६८९०० |
उमरगा | ४६१०० |
वाशी | ३४५०० |
लोहारा | ३५६०० |
हे ही वाचा सविस्तर : Tur Kharedi : शासकीय केंद्रांकडे तूर उत्पादकांनी 'या' कारणामुळे फिरवली पाठ