Harbhara Market Price :
अनिल भंडारी
बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात चांगल्या प्रतीच्या हरभऱ्याला ७ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे ; परंतु आवक कमालीची घटली असून शनिवारी केवळ सहा क्विंटल हरभऱ्याची आवक झाली.
२०२१-२२ व २०२२-२३ च्या दोन्ही रब्बी हंगामांत हरभऱ्याचे बंपर उत्पादन होऊन शासनाचे गोदाम भरले होते. त्यामुळे शासनाकडे बफर स्टॉकही होता. स्टॉकिस्टकडेही चांगला स्टॉक होता. त्यामुळे गेल्या वर्षीपर्यंत हरभऱ्याचे भाव तेजीत आले नाहीत.
यात मागील रब्बी हंगामात उत्पादन घटले; परंतु बाजारात शासनाच्या हमीपेक्षा कमी भाव मिळत होता. शासनाकडील बफर स्टॉकमुळे बाजारात हरभऱ्याला उठाव कमी राहिला. परिणामी बाजारात ४ हजार ५०० रुपये क्विंटल भाव काही महिने स्थिर राहिले.
त्यापलीकडे हरभऱ्याचे भाव वाढत नव्हते. त्यामुळे आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांनी नाइलाजाने त्यांच्याकडील हरभरा विकला. दुसरीकडे शासनाकडील हरभऱ्याचा बफर स्टॉकही कमी होत गेला; परंतु सणासुदीमुळे मागील काही महिन्यांपासून हरभरा डाळीची, तसेच बेसनाची मागणी वाढली आहे.
वाढत्या मागणीमुळे डाळ मिलकडून हरभऱ्याला भाव चांगला मिळू लागला आहे; परंतु बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक कमालीची घटली आहे. बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किमान भाव ६ हजार ४५० व कमाल भाव ७ हजार ८९१ रुपये होता.
चांगला आणि हमीपेक्षा जादा भाव मिळत असला तरी बाजारात हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. चार दिवसांपूर्वी केवळ एक क्विंटल, तर शनिवारी सहा क्विंटल इतकीच हरभऱ्याची आवक झाली. सरासरी भाव ७ हजार १६२ रुपये प्रतिक्विंटल मिळाला.
सोयाबीनचा भाव स्थिर
येथील बाजार समितीमध्ये शनिवारी ५३० क्विंटल धान्याची आवक झाली. यात सोयाबीनची २४० क्विंटल आवक झाली. भाव ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपये मिळाला, ज्वारीची क्विंटल आवक झाली. भाव २ हजार ते २ हजार ८०० रुपये क्विंटल होते. बाजरीची २८ क्विंटल आवक झाली. २ हजार ३४० ते ३ हजार ८७० रुपये भाव दर्जानुसार मिळाला.
उडदाची १६३ क्विंटल आवक
बाजार समितीमध्ये उडिदाची १६३ क्विंटल आवक झाली. किमान ४ हजार ८०० ते कमाल ७ हजार २६० रुपये भाव मिळाला. सरासरी भाव ६ हजार २४३ रुपये क्विंटल राहिला. तसेच मुगाची ३० क्विंटल आवक झाली. भाव ५ हजार २०१ ते ७ हजार ७०० रुपये क्विंटल मिळाला.