उन्हाळ्यात रानमेव्याला खरेदीदारांकडून चांगलीच मागणी असते. रानमेवा बाजारातील आवकही वाढली आहे. त्यातीलच एक रानमेवा म्हणजे जांभूळ, गोड-तुरट जांभळे सध्या शहरातील विविध फळ विक्रेत्यांकडे विक्रीला आली आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत जांभळ्याच्या दराने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.
उत्पादन घटल्याने घाऊकसह किरकोळ बाजारात जांभळांचे दर हापूस आंब्याला टक्कर देत आहेत. फळबाजारात एक डझन हापूस आंबे ४०० रुपयाने विक्री होत आहेत, तर जांभळाची ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड मार्केटमध्ये लोणावळा, खंडाळा येथून जांभळांची आवक होते. यंदा १५ ते २० दिवस उशिराने हंगाम सुरू झाला. लहरी हवामानामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात जांभळांची आवक घटली आहे.
सध्या बाजारात मध्यम आकाराच्या स्थानिक जांभळांना प्रति किलो ३०० ते ४०० रुपये दर मिळत आहे. तर, लहान जांभळांना ३०० रुपये दर मिळत आहे. दर्जेदार जांभळांना ४०० ते ४५० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे जांभूळ विक्रेते किरण वंजारी यांनी सांगितले.
काय आहेत वैशिष्ट्ये?
■ स्थानिक जांभूळ - साल पातळ, टिकवणक्षमता कमी, गुजरातच्या तुलनेत अधिक गोड, या जांभळांना राज्यात मोठी पसंती मिळते.
■ कर्नाटक, गुजरातची जांभळे लालसर असतात. साल जाड असते. जाड सालीमुळे टिकवणक्षमता अधिक राहते. गोडीलाही चांगली असतात. या जांभळांना मोठी पसंती मिळते.
गुजरातच्या जांभळाची आवक घटली
दरवर्षी एप्रिलच्या शेवटी बाजारात गुजरात, कर्नाटक राज्यातून जांभळाची मोठ्या प्रमाणात आवक होते. पण, यंदा गुजरातमधून जांभळाची आवक अत्यंत कमी प्रमाणात होत आहे, तर कर्नाटकातून येणाऱ्या जांभळाची आवक अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक भागातून जांभळे बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहेत.
अधिक वाचा: Monsoon Update; महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?