पाकिस्तानने कांद्याचे किमान निर्यात मूल्य १२०० डॉलर प्रति मे.टनावरून थेट ७५० डॉलर प्रति मे. टन इतके घटवले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत पाकिस्तानच्या कांद्याची विक्री सुलभ होणार असून पाकिस्तानचा कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यास मदत होणार असल्याचे निर्यात क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. कांदा निर्यात वाढल्याने तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावातही सातत्य राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जानेवारी महिन्यात देशांतर्गत कांद्याच्या किमती वाढत असल्याचे पाहून पाकिस्तान सरकारने कांदा निर्यात शुल्क १२०० डॉलर प्रति मे.टन असे केले होते. रमजानच्या काळात तर तेथील सरकारने कांदा निर्यातीवर बंदीही घातली, पण तरीही स्थानिक बाजारांतील कांदा दर काही कमी झाले नाही. अशातच आता बलुचिस्तान, दक्षिण पंजाब या राज्यांमधून नवीन कांद्याची आवक होण्यास सुरूवात झाल्याने बाजारपेठेतील दर स्थिर आहेत.
मात्र ही आवक वाढली, तर देशातील कांद्याचे भाव पडतील ही भीती पाकिस्तानच्या सरकारला वाटते. म्हणूनच त्यांनी २३ एप्रिलपासून तातडीने कांद्याचे किमान निर्यात मूल्य तब्बल ४५० डॉलरने घटवले आणि ७५० डॉलर प्रति मे.टन इतके केले. विशेष म्हणजे मागील वर्षी देशातील किंमती स्थिर राहण्यासाठी भारत सरकारने कांद्याचे निर्यात मूल्य ८०० डॉलर प्रति मे.टन असे वाढवले होते. त्यापेक्षाही पाकिस्तानचे नवे निर्यात मूल्य कमी असल्याने त्याचा फायदा त्यांना जागतिक बाजारपेठेत स्थान बळकट करण्यात होणार आहे.
पाकिस्तानात कांद्याचा हंगाम सुरू असून आवक वाढत आहे. यंदा तेथे कांद्याचे चांगले उत्पादन होण्याचा अंदाज आहे. याशिवाय शेजारील देश अफगाणिस्थान व इजिप्त यांच्याकडेही कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे. तेही जागतिक बाजारपेठेत भाव खाण्याची शक्यता आहे. याशिवाय भारताने अंशत: का होईना कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सावध होऊन पाकिस्तान सरकारने आपले कांद्याचे दर वेळीच कमी केल्याचे सांगितले जात आहे.
भारतातही उन्हाळी हंगामाचा कांद्याचे यंदा चांगले उत्पादन झाले आहे. मात्र निर्यातबंदीच्या सरकारी धोरणामुळे येथील बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा ५ ते १२ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे कांदा चाळी आहेत किंवा साठवणुकीची सोय आहे, असे शेतकरी कांदा साठवून ठेवताना दिसत आहेत. तर ज्यांच्याकडे तशी सोय नाही, त्या शेतकऱ्यांना मात्र कांदा तातडीने विकल्याशिवाय पर्याय नसून निर्यात सुरू होऊन भाव वाढतील अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच अच्छे दिन आल्याचे स्थानिक कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे.