अकलूज : अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंबबाजारात प्रवीण निकम (रा.डोंबाळवाडी, ता. माळशिरस) याच्या डाळिंबाला ज्ञानदेव कुंडलिक कोकरे यांच्या आडत दुकानात प्रतिकिलो २६१ रुपये दर मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी उच्च प्रतीच्या डाळिंबाला १०० ते १५० रु. दर मिळत होता. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा अच्छे दिन आले आहेत.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने परिसरातील शेतकऱ्यांची अडचण ओळखून डाळिंब बाजार सुरू केल्याने पंढरपूर, इंदापूर, माढा, सांगोला, माळशिरस तालुक्याच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
अकलूज परिसरातील डाळिंब उत्पादकांना परजिल्ह्यातील मार्केटमध्ये डाळिंब विक्रीस पाठविण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत होता. अकलूज बाजार समितीत डाळिंब मार्केट सरू झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.
रोख रक्कम अदा, संगणकीय पावती वाजवी दर व शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बाजार समितीचे विशेष लक्ष आहे यामुळे अकलूज डाळिंब मार्केटमध्ये आवक दिवसेंदिवस वाढत आहे, असे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले.
दररोज ४५०० क्रेटची आवकशेतकरी वर्गाच्या अकलूज बाजार समिती डाळिंब मार्केटमध्ये विक्रीसाठी डाळिंब घेऊन येण्याचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. त्यामुळे अकलूज डाळिंब मार्केटमध्ये प्रतिदिवस सुमारे ४००० ते ४५०० हजार क्रेटची आवक होत आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी दिली.