तुरीला चांगलाच दर मिळत असला तरी मागील एक वर्षापासून सोयाबीनला भाव कमी आहे. सातारा बाजार समितीत तर सोयाबीनला क्विंटलला पाच हजारांच्या आतच दर येत आहे. त्यामुळे चांगला दर मिळण्यासाठी सोयाबीन घरात आणखी किती दिवस ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण दर वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे.
सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वांत मोठा समजला जातो. कारण जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे सुमारे ३ लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी सोयाबीनचे ६८ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले होते; पण प्रत्यक्षात ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले होते. याला कारण म्हणजे सोयाबीनला चांगला भाव मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला; पण गेल्या वर्षी काढणीच्या वेळीच दरात घसरण झाली. त्यातच अतिवृष्टीत सोयाबीनचे नुकसान झाले. यामुळे सोयाबीन काळे पडले. बाजारात काळ्या सोयाबीनला दर पाडून मागत होते. मात्र, शेतकऱ्यांनी दर वाढेपर्यंत वाट पाहिली.
जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर सोयाबीनचा दर वाढला. साडेपाच हजारांवर आला; पण त्यानंतर दरात घसरण झाली. पाच हजारांच्या खाली भाव आला. यंदाही तशीच स्थिती आहे. कारण यावर्षीही सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. मात्र, उत्पादन कमी होऊनही दर वाढलेले नाहीत. गेले काही महिने सोयाबीनचा क्विंटलचा भाव पाच हजारांच्या आतच आहे. त्यामुळे दराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता काय करायचे, असा प्रश्न पडलेला आहे.
यंदा ८५ हजार हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र..- सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सोयाबीन क्षेत्रात वाढ होत चालली आहे.- गेल्या वर्षी खरीप हंगामात तब्बल ८७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. टक्केवारीत हे प्रमाण १२७ होते.- यावर्षी कृषी विभागाने ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र निश्चित केले. प्रत्यक्षात ८५ हजार हेक्टरवर पेरणी झालेली.
तूर करते मालामाल; पण क्षेत्र कमी- बाजारपेठेत तुरीला चांगला दर मिळत आहे. विदर्भात क्विंटलला १० हजारांवर दर मिळत आहे.- सातारा बाजार समितीत ६ ते ७ हजारांदरम्यान भाव येत आहे. यामुळे शेतकरी मालामाल होत आहे; पण सातारा जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र अत्यल्प असते.- यंदाच्या खरीप हंगामात अवघे ९७५ हेक्टर क्षेत्रावर तूर होईल, असा अंदाज होता; पण प्रत्यक्षात पेरणी ४५१ हेक्टरवर झाली होती.