नामदेव मोरे
मुंबई : कृषिप्रधान भारताला अद्यापनवी डाळी व कडधान्यांच्या उत्पादनात आत्मनिर्भर होता आलेले नाही. २०२२- २३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये दुप्पट डाळी आयात कराव्या लागल्या आहेत. वर्षभरात ४६.५ लाख टन आयात झाली असून, त्यासाठी ३.७ अब्ज डॉलर खर्च करावा लागला आहे.
आयात खर्चात एक वर्षात ९३ टक्के वाढ झाली असून, टांझानिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार या देशांची तिजोरी भरली आहे. जगातील डाळी व कडधान्यांचा सर्वाधिक खप भारतात होतो. रोजच्या आहारात डाळी, कडधान्यांचा समावेश असतो. त्याशिवाय आहार पूर्णच होत नाही.
देशवासीयांना पुरेल एवढा गहू, तांदूळ देशात पिकतो; पण डाळी, कडधान्ये मात्र पुरेशा प्रमाणात पिकविणे अद्याप शक्य झालेले नाही. शासनाने डाळींबाबत देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उत्पादनात वाढही होत आहे; परंतु मागणीचे प्रमाण व उत्पादन यात मोठी तफावत असल्यामुळे प्रत्येक वर्षी डाळी मोठ्या प्रमाणात आयात कराव्या लागत आहेत.
२०२३-२४ मध्ये डाळींची झालेली आयात (आकडे दशलक्ष डॉलर)
देश | २०२२-२३ | २०२३-२४ | टक्केवारीतील फरक |
टांझानिया | १०४ | २८१ | १७० |
ऑस्ट्रेलिया | १९६ | ४९० | १५० |
कॅनडा | २९० | ५८७ | १०२ |
म्यानमार | ५३३ | ७२४ | ३५ |
मोझांबिका | २५७ | २१६ | १६ |
खर्चात ९३ टक्के वाढ
वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये २५.३ लाख टन डाळींची आयात झाली होती. २०२३-२४ मध्ये ही आयात ४६.५ लाख टनांवर गेली आहे. डाळी आयात करण्यासाठी वर्षाला तब्बल ३.७ अब्ज डॉलर म्हणजेच साधारणतः ३१ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. आयात खर्चात ९३ टक्के वाढ झाली आहे.
म्यानमारमधून सर्वाधिक आवक
देशात गतवर्षी म्यानमारमधून सर्वाधिक डाळीची आवक झाली आहे. यानंतर कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मोझांबिका व टांझानियामून सर्वाधिक आवक झाली आहे. एक वर्षात टांझानियामधून आयातीत १७० टक्के, तर ऑस्ट्रेलियातून आयातीमध्ये १५० टक्के वाढ झाली आहे. मोझांबिकामधून आयात कमी झाली असल्याचे वाणिज्य विभागाच्या आकडेवरून स्पष्ट होत आहे.
देशात डाळींची मागणी वाढत असून उत्पादन कमी होत आहे. यामुळे प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात डाळी आयात कराव्या लागतात. २०२३-२४ मध्ये डाळी आयात करण्यासाठी ३.७ अब्ज डॉलर खर्च झाल्याचे वाणिज्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आयात खर्चात एका वर्षात ९३ टक्के वाढ झाली आहे. - नीलेश वीरा, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
अधिक वाचा: या सात धान्यांपासून तयार करा अशी स्लरी, जी ठेवेल मातीची तब्येत बरी