कोकणच्या हापूसला परदेशातूनही मागणी वाढत असून, आंबा निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत परदेशात ७३५.५३२ मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. परदेशात आंब्याला मागणी असल्याने दर टिकून असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
परदेशात आंबा पाठविण्यासाठी प्रत्येक देशाचे निकष निश्चित आहेत. रत्नागिरी व देवगड येथे आंबा परदेशी पाठविण्यापूर्वी करण्यात येणारी प्रक्रिया सुविधा उपलब्ध आहे. मात्र, २०२० पासून रत्नागिरी केंद्रावरून आंब्याची निर्यात झालेली नाही.
वाशी येथे आंबा पाठवल्यानंतर तेथे आंब्यावर संबंधित देशांच्या सूचनेनुसार आवश्यक उष्ण, बाष्पजल, व्हेपर प्रक्रिया केल्यावरच आंबा निर्यात केला जातो. गतवर्षी आंब्याचे प्रमाण कमी असल्याने परदेशात निर्यात करण्यात आली नव्हती.
मात्र, सन २०२२ मध्ये १६.५ मेट्रिक टन आंबा निर्यात झाला होता. परदेशातील निर्यात वाढीसाठी केंद्र शासनाकडून अजून प्रयत्न होणे गरजेचे आहे. निर्यातीचे प्रमाण वाढल्यास बागायतदारांना चांगले उत्पन्न मिळू शकेल.
कोरोनापूर्वी लासलगावातून निर्यात
कोरोनापूर्वी रत्नागिरी येथील पणन विभागातून थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंबा निर्यात केली जात होती. त्यासाठी प्रक्रिया करण्यात येत होती. उष्णजल प्रक्रियेनंतर लासलगाव येथे आंबा पाठविण्यात येत असे. तेथे व्हेपर प्रक्रिया केल्यानंतर थेट विमानतळावर आंबा पाठविला जात होता.
परदेशी निर्यात किती झाली?
यूएसए - २२०.०४३
युरोपियन युनियन - ४२.३७७
जपान - ६.५९१
इंग्लंड - ४३२.९१
ऑस्ट्रेलिया - १३.३८१
न्यूझीलंड - २०.२३
एकूण निर्यात (टन) - ७३५.५३२
अधिक वाचा: आता पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बागेतील आंबा थेट देश-विदेशात