सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरीच ठेवले होते. परंतु सद्यःस्थितीत सण, उत्सवाचे दिवस असल्यामुळे पैशाची गरज शेतकऱ्यांना पडत आहे. हमीभावाप्रमाणे सोयाबीनला पैसा मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तेंव्हा शेतकऱ्यांचा विचार करून शासनाने ४ हजार ६०० रुपये प्रमाणे सोयाबीनला भाव द्यावा, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
गत हंगामात वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे कुठे सोयाबीन उगवले तर कुठे उगवले नाही. तर काही ठिकाणी सोयाबीनची द्वार पेरणी करावी लागली. यावर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे सोयाबीनला हमीभावाप्रमाणे तरी पैसा मिळेल असे शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु सद्य:स्थितीत हमीभावाप्रमाणे भाव मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे तर शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून घरीच सोयाबीन ठेवू लागला आहे. सद्यःस्थितीत उन्हाळी हंगाम असला तरी काही दिवसांत खरीप हंगाम येणार आहे. त्यामुळे पैशाची गरज भासत आहे. परंतु हमीभावाप्रमाणे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरीच ठेवणे पसंत केले आहे.
दुसरीकडे सण, उत्सवाचे दिवस असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले आहे. सध्या सोयाबीनला ४६०० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी बाजारात ४४५० रुपये दर मिळत आहे. या प्रकारामुळे आगामी काळात पेरणी, मशागत करावी तरी कशी? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शासनाने शेतकयांच्या समस्या जाणून घ्याव्यात
दोन वर्षांपासून शेतीमालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी तर पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे सोयाबीन कमीच झाले. शेतकयांची अडचण लक्षात घेऊन हमीभावाप्रमाणे तरी पैसा द्यावा. - रमेश काटकर, शेतकरी कळमनुरी
कधी निसर्ग साथ देतो तर कधी संकटांवर संकटे आणतो. अशावेळी शेतकरी शासनाकडे धाव घेतात. परंतु शेतकऱ्यांना निराश होऊनच परतावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांची समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. तेंव्हा सर्व शेतीमालाला योग्य भाव देणे गरजेचे आहे. - शेख शब्बीर, शेतकरी कळमनुरी
बी-बियाणे, खते घ्यावी तरी कशी?
यावर्षी म्हणावा तसा पाऊस आला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी स्प्रिंकलरद्वारे पिके जगविली. मात्र मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. त्यात बाजारात विक्री केल्यास अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र आहे.
किमान शासनाने जाहीर केलेला हमीभाव तरी द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. किती दिवस सोयाबीन घरी ठेवायचे, असा विचार शेतकरी करीत आहेत. हाती पैसा नसेल तर खरीप हंगामात बी-बियाणे, खते. औषधी घ्यावे तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सोयाबीनचे भाव पडतेच
■ पावसाचा लहरीपणा, ऐन भरात असताना यलो मोझेंकचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे उत्पादन प्रचंड घटले. अशा परिस्थितीत बाजारात किमान सहा हजार रूपये क्विंटलने विक्री होईल, अशी आशा होती. मात्र, यंदा सोयाबीनने पाच हजारांचा पल्लाही गाठला नाही.
■ अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत चार ते पाच महिने सोयाबीन विक्रीविना ठेवले. परंतु, भाव वधारले नाहीत. त्यामुळे आणखी किती दिवस भाववाढीची प्रतीक्षा करायची म्हणून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत आहेत.