Join us

आगामी काळात लातूर बाजारात तुरीचे भाव कसे असतील? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 1:06 PM

सध्या विविध बाजारसमित्यांमध्ये तुरीला सरासरी ८ ते ११ हजारांच्या दरम्यान बाजारभाव मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही तूर साठवून ठेवलेली आहे. तर काही शेतकरी येणाऱ्या हंगामासाठी तुरीच्या लागवडीचा विचार करत आहेत. मात्र त्यांना भविष्यात तुरीचे बाजारभाव कसे असतील याची उत्सुकता आहे. त्यानुसारच ते तूर लागवडीचा निर्णय घेतील.

भारत हा जगातील सर्वात मोठा तूर उत्पादक तसेच उपभोक्ता देश आहे. भारतातील तूर उत्पादनात महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश राज्यांचा वाटा ६० टक्के पेक्षा जास्त आहे. तूरीच्या बाजारपेठेवर मागील वर्षातील तूर साठा, आयात तसेच चालू वर्षातील उत्पादन यांचा परिणाम होताना दिसतो. केंद्र शासनाने तूर निर्यातीसाठी खुली केली असून तूरीचा आयात कोटा मर्यादित ठेवलेला आहे. विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFT) ने प्रकाशीत केलेल्या अहवालानुसार तूरीसाठीचे - मुक्त आयात धोरण मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आले होते.

माहे डिसेंबर ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्ष मार्च २०२३-२४ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहिलेली दिसून येत आहे. एप्रिल २०२४ (१२ एप्रिल २०२४ पर्यंत) मध्ये ३.२४ लाख टन आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ९.१ लाख टन होती.

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२३-२४ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३३.३९ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास सारखेच असल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रातील २०२२-२३ मधील उत्पादन ९.२ लाख टनांवरून सन २०२३-२४ मध्ये ८.७ लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०२२ पासून तुरीच्या किंमती वाढत आहेत. गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव जास्त आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या जुलै ते सप्टेंबर मधील सरासरी किंमती खालीलप्रमाणेः जुलै ते सप्टेंबर २०२१: रु. ६.३६२/क्विंटलजुलै ते सप्टेंबर२०२२ः रु.७,२८८/क्विंटलजुलै ते सप्टेंबर२०२३: रु.१०.२१६/क्विंटल

सध्याच्या हंगामासाठी सरकारने जाहीर केलेल्या तुरीच्या किंमती या किमान आधारभूत किंमतीपेक्षा (रु. ७०००/क्विंटल) जास्त आहेत. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती व जोखीम विश्लेषण कक्षाने वर्तविलेल्या अंदाजानुसार जुलै २४ ते सप्टेंबर २४ दरम्यान तुरीचे बाजारभाव ८५०० ते ११००० रु प्रति क्विंटल असे राहण्याची शक्यता आहे. (गेल्या वर्षांच्या तुलनेत चालू वर्षातील आयात जास्त राहील असे गृहीत धरून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सदर संभाव्य अंदाज हा FAQ ग्रेड च्या तूरीसाठी आहे.)

टॅग्स :तूरबाजारशेतकरीशेती