विनायक चाकुरे
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात पंधरा दिवसापासून नवीन चिंचेची आवक सुरू झाली आहे. दर ९ हजार रुपये ते १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या चिंचेचा दर्जा खालावला असून, येणाऱ्या दिवसात आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या व्यवसायातून चिंच फोडण्यापासून ते पाला करून ट्रक भरणाऱ्या हमालापर्यंत सर्वांच्या हाताला काम मिळत आहे. चिंचेचे झाड विकत घेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांपासून ते तेलंगणा व तामिळनाडू या भागात विक्री करणाऱ्यांना व्यापाऱ्यांच्या हातात चार पैसे जास्तीचे दिसत आहे.
चिंचेचे झाड जून, जुलै महिन्यात फुलोऱ्यात असताना त्याचा सौदा शेतकरी ओळखीच्या छोट्या व्यापाऱ्यांशी करीत असतो. तीन ते पाच हजारापर्यंत फुलोरा असतानाच झाडाचा सौदा शेतकरी करतात. उदगीर तालुका व परिसरात चिंचेची फार मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. शेतकरी ही झाडे विकतो. व्यापारी त्या झाडाची राखण करून चिंच परिपक्व झाल्यानंतर मजुरांकडून चिंच झोडपली जाते. त्यानंतर चिंच गोळा करून घरी आणले जाते. १५ ते २५ रुपये किलो दराने व्यापारी चिंच फोडून घेतात.
फोडलेली चिंच व चिंचुका वेगवेगळ्या पोत्यात भरून ती बाजारात विक्रीसाठी आणली जाते. चिंचुक्याच्या विक्रीतून चिंच फोडणाऱ्या महिलांच्या मजुरीचा खर्च निघून जातो. अशा प्रकारचे लहान व्यापार करणारे शेकडो व्यापारी उदगीर तालुक्यातील विविध गावांत आहेत.
यंदा चिंचेच्या झाडाला फळधारणा चांगली झाली असल्याने लहान व्यापाऱ्यांना फायदा होत आहे. उदगीरच्या बाजारात चिंचेचा सकाळी ११ वाजता सौदा निघतो. खरेदीदार व्यापारी कमी असले तरी स्पर्धा असल्याने व तेलंगणा व तामिळनाडू, गुजरात राज्यात मागणी असल्यामुळे सौद्यात भाव चांगला मिळतो आहे. मागील वर्षी ८ हजार ते १० हजारांपर्यंत दर टिकून होते. यंदा ९ ते १२ हजार रुपये क्विंटल दराने विक्री होत आहे.
चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड
हैदराबाद, तेलंगणा, तामिळनाडूत मागणी
चिंचेला हैद्राबाद, तेलंगणा, तामिळनाडू व थोड्या फार प्रमाणात गुजरात या भागात मागणी आहे. पाला करण्यास कामगार मिळत नसल्यामुळे पाला करण्यास दोन-दोन दिवस थांबावे लागते. हा व्यवसाय उन्हाळ्यातला तीन महिन्याचा दिसत असला तरी जून महिन्यापासून सुरुवात होते. फुलोरा आला की व्यापाऱ्यांपासून ते पाला फोडून ट्रक भरणाऱ्या व्यापाऱ्यांना वर्षभराची कमाईचे साधन देणारा चिंचेचा व्यवसाय आहे.
मजुरांमुळे गाडी भरण्यास उशीर...
यंदाची आवक सुरू झाली आहे. सुरूवातीला सध्या आवक कमी असून मालाचा दर्जा मागील वर्षाप्रमाणे नाही. त्यातच स्पर्धा असल्याने नफा कमी झाला आहे, पाला करणाऱ्या कामगारांच्या कमतरतेमुळे ट्रक थांबवून ठेवावा लागतो. एक गाडी भरण्यासाठी किमान दोन दिवस थांबावे लागत असल्याचे उदगीर बाजार समितीमधील चिंच खरेदीदार व्यापारी नरसिंग रमासाने यांनी सांगितले.