Join us

टोकन परस्पर दिल्यास बीट रोखणार; बाजार समितीचा आडते व व्यापाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 4:53 PM

माल बिटात नसल्यास बाजार समितीला कळवा

सध्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी गर्दी करीत आहेत. असे असताना अनेक आडते त्यांना दिलेले बिटाचे टोकन परस्पर दुसऱ्याला देत असल्याने इतर शेतकऱ्यांना अनेक दिवस ताटकळत बसावे लागते. यापुढे आडत्याने त्यांना दिलेले टोकन इतरांना परस्पर दिल्यास त्यांचे बीट रोखण्यात येईल, असा इशारा बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्ह्यात हळद काढणी वेगाने सुरू असून दरदिवशी पाच ते सहा हजार पोत्यांची मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डात आवक सुरू आहे. याशिवाय इतर भुसार माल गहू, ज्वारी व अन्य शेतमालाची आवकही होत आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त झाल्याने व्यापाऱ्यांना खरेदी करणेही अवघड होत आहे.

दररोज आवक वाढत असल्याने बाजार समितीच्या वतीने आडत्यांना बीटासाठी ठरावीक वाहनांचे व लॉटचे टोकन दिले जात आहे. पण, काही आडते व्यापारी आपल्याला मिळालेला टोकन नंबर परस्पर दुसऱ्याला देत आहेत.

त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी आणूनही शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. बाजार समिती प्रशासनही गोंधळात आहे. टोकन दिल्यानंतर काही आडते शेतमालाची विक्री करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

माल बिटात नसल्यास बाजार समितीला कळवा

■ ज्या आडत दुकानदारास काही अडचण असेल किंवा माल बिटात टाकायचा नसल्यास त्यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना लेखी किंवा फोनद्वारे कळवावे, असे बाजार समितीने सूचित केले आहे. तसे न करता तो नंबर परस्पर दिला तर ज्या आडत दुकानदाराने दिला व ज्या आडत दुकानदाराने घेतला, त्या दोन्ही दुकानाचे बिंट रोखण्यात येईल. 

तसेच काही आडते दररोज सूचना देऊनसुद्धा दिलेल्या नंबरपेक्षा जास्त लॉट टाकत असतील तर त्यांनी जेवढे नंबर मिळाले तेवढेच आणावे.

शेतमालाची आवक वाढली

■ मार्केट यार्डात मागील महिनाभरा- पासून हळदीची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. दरदिवशी किमान पाच ते सहा हजार पोत्यांची आवक होत आहे. तसेच अन्य शेतमालही विक्रीसाठी येत आहे.

दोन शिफ्टमध्ये बीट सुरु

■ बाजार समितीतील आवक पाहता पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत केले जाते. त्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ४ ते सायंकाळी ६ या दोन शिफ्टमध्ये बीट करण्यात येत आहे.

हेही वाचा - निंबोळी अर्काच्या वापरामुळे वाचतो २५ टक्क्याहून अधिक कीटकनाशकांचा खर्च

टॅग्स :बाजारनांदेडनांदेडपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्डशेतकरीशेती