कुईवाडी : माढा तालुक्यात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे अगदी काढणीस आलेली खरीप पिके धोक्यात आली. त्यातल्या त्यात उडीद पिकाला त्याचा मोठा फटका बसला. पावसाची थोडी उघडीप मिळताच शेतकऱ्यांकडून उडीद काढणीला प्रारंभ झाला आहे.
उडीद विक्रीसाठी कुडूवाडी, मोडनिंब, माढा व टेंभुर्णी येथील बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात दाखल झाला. परंतु, त्याला योग्य भाव मिळत नसल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
त्यामुळे किमान केंद्र सरकारच्या ७ हजार ४०० या हमीभावाने तरी उडीद खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. माढा तालुक्याचे सरासरी उडिदाचे क्षेत्र हे २० हजार ५२१ हेक्टर आहे. यातील नुकत्याच पडलेल्या पावसामुळे निम्मे क्षेत्र हे वाया गेले आहे.
त्यामुळे त्याचे तातडीने पंचनामे करावेत, अशीही मागणी शेतकऱ्यांतून झाली आहे. यंदा उडिदाला पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० इतका उच्चांकी भाव मिळाला होता.
सध्या उडीद माल हा खराब येत असल्याने ६ हजारांपर्यंत त्याचा भाव उतरला आहे. याचबरोबर उच्चांकी दर्जाच्या उडिदाला अजूनही चांगल्या दर्जाचा भाव मिळत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
माल ठेवून त्यावरती उचल घ्या- उडीद उत्पादित शेतकऱ्यांसाठी शासनाकडील हमीभाव केंद्र आपल्याकडे अद्यापपर्यंत सुरू झालेली नाहीत. त्याबाबत शासनाकडे आम्हीदेखील मागणी केली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास तातडीने ती सुरू करण्यात येतील.- शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडून जर भाव कमी मिळत असेल तर त्यांनी कोणत्याही प्रकारची गडबड न करता तो माल आमच्याकडे ठेवून त्यावरती उचल घ्यावी, असे कुईवाडी बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील-जामगावकर यांनी सांगितले.
उडीद उत्पादित शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहे. शासनाकडे त्याबाबत हमीभाव केंद्राची आम्ही मागणी केली असून, त्याला मान्यता मिळाल्यास ती केंद्र तातडीने सुरू करण्यात येतील. - बंडूनाना ढवळे, अध्यक्ष, माढा तालुका खरेदी-विक्री संघ
माढा तालुक्यातील उडीद उत्पादित शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा माल बाजारपेठेत घेऊन जावा. त्यांनी कोणत्याही प्रकारची गडबड करू नये, चांगल्या मालाला योग्य भाव मिळत आहे. - बी. डी. कदम, तालुका कृषी अधिकारी, माढा
शासनाने उडीद शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर हमीभाव केंद्र सुरू करावीत आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यावा. त्याचबरोबर विमा कंपनीनेही आम्हाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी. - श्रीकांत मुळे, शेतकरी, जामगाव