सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टिनशेडमध्ये टाकणे आवश्यक आहे. परंतु, शेडमधून व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्प्या हटत नसल्यामुळे जागेअभावी शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर टाकावा लागत आहे. यावरून शेतकऱ्यांत संतापाचा सूर उमटत असून, बाजार समिती प्रशासन शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचेच हीत जोपासत असल्याचा आरोप ८ जून रोजी शेतकऱ्यांनी केला.
हिंगोली येथील मोंढ्यात सध्या भुईमूग विक्रीसाठी येत आहे. गत पंधरवड्याच्या तुलनेत आवक कमी असली तरी टिनशेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या पडून आहेत. जवळपास ६० ते ७० टक्के जागा व्यापाऱ्यांच्या मालाने व्यापल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याचे चित्र आहे.
परिणामी, पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना भुईमूग रस्त्यावर टाकावा लागत आहे. अचानक पाऊस आला तरी भुईमुगावर पाणी फेरल्या जाण्याची शक्यता आहे. परंतु, बाजार समिती प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले नसल्याने अनेकवेळा व्यापाऱ्यांच्या मनमानीचा फटका शेतकऱ्यांना बसतो. यासंदर्भात शनिवारी सेनगाव तालुक्यातील जवळा बु. येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
पाऊस आला तर शेतकऱ्यांनी काय करायचे?
• शेतकरी काबाडकष्ट करून शेतमाल पिकवितो. मात्र, मोंढ्यात विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाची कवडीमोल किंमत केली जात नाही. मोंढ्यात माल टाकल्यानंतर दिवसभर सावरासावर करावी लागते.
• त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असूनही शेतकऱ्यांचा भुईमूग टिनशेडबाहेर रस्त्यावर टाकण्यात येत आहे. अचानक पाऊस आला तर विक्रीस आणलेल्या मालावर पाणी फेरल्या जाऊ शकते. परंतु, याचे बाजार समितीला काहीच देणे-घेणे नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सहाशे क्विंटल भुईमुगाची आवक...
• शनिवारी मोंड्यात ६०० क्चेिटल भुईमुगाची आवक झाली होती. सरासरी ५ हजार ७६७ रुपये भाव मिळाला. तर १९५ क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.
• ११ हजार ४०० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तसेच हळदीची आवक १ हजार ३०० क्विंटल झाली होती. सरासरी १४ हजार ८०० रुपये क्विंटलने हळद विक्री झाली.