Join us

दहा दिवसांत कांदा बाजारभाव दोन हजारांनी उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2023 2:59 PM

शासनाने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर अवघ्या दहा दिवसांत चार हजारांहून दोन हजारांवर आले आहेत. शनिवारी अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथम प्रतीच्या कांद्याला १८५० ते २२५० प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शासनाने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर अवघ्या दहा दिवसांत चार हजारांहून दोन हजारांवर आले आहेत. शनिवारी अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथम प्रतीच्या कांद्याला १८५० ते २२५० प्रतिक्विंटल भाव मिळाला. याच समितीत ७ डिसेंबरला कांद्याला ४२०० रुपये भाव मिळाला होता.

मागील आठवड्यात केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याचे दर घसरण्यास सुरुवात झाली. दहा दिवसांपूर्वी गावरान व लाल कांद्याला साडेतीन ते चार हजारांचा भाव होता. आता तो थेट दीड ते दोन हजारांवर आला आहे. शनिवारी नगर बाजार समितीत १ लाख ८ हजार गोण्या लाल कांद्याची आवक झाली. यात प्रथम प्रतीच्या कांद्याला १८५० ते २२५० रुपये भाव मिळाला. याशिवाय द्वितीय प्रतीला १०५० ते १८५०, तृतीय प्रतीस ६५० ते १०५०, तर चतुर्थ प्रतीस १५० ते ६५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दुसरीकडे मात्र गावरान कांद्याची आवक रोडावली आहे.

शनिवारी गावरान कांद्याची केवळ २ हजार ४५० गोण्यांची आवक झाली. त्यातही प्रथम प्रतीस १६०० ते २१५०, द्वितीय प्रतीस ९०० ते १६००, तृतीय प्रतीस ५०० ते ९००, तर चतुर्थ प्रतीस ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. भाव पडतील या धास्तीने शेतकरी लाल कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणत आहेत. त्यातून आवक वाढल्यानेही भावावर परिणाम होत आहे.

जुन्या कांद्याची आवक घटली, लाल कांद्याची वाढली- जुना गावरान कांदा मात्र आता अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळेच ती आवक कमी आहे. सध्या बाजारात लाल कांद्याचीच आवक मोठी आहे.- पंधरा दिवसांपूर्वी लाल कांद्याची आवक ५० ते ६० हजार गोण्या होती. ती आता एक लाखावर गेली आहे.

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीकेंद्र सरकार