Join us

सोन्या-चांदीच्या शर्यतीत; आता तुरीनेही गाठला भावाचा उच्चांक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 10:22 AM

सलग दुसऱ्या वर्षी घटले तुरीचे उत्पादन

संजय लव्हाडे

जालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा सणानिमित्त बाजारपेठ सज्ज झाली असून, सोने चांदीच्या दरात मोठी तेजी आली आहे. तुरीच्या दरातही मोठी भाववाढ झाली असून, धान्य व किराणा तसेच खाद्यतेलांचे दरही तेजीत आहेत.

एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी दरवाढ झाली. अवघ्या चार दिवसांत सोने आणि चांदीने गेल्या चार महिन्यांतील सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. सोने या चार दिवसांत २३०० रुपयांनी तर चांदी ४००० रुपयांनी महागली. जालना बाजारपेठेत सध्या सोने ७१५०० रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर ८१००० रुपये प्रति किलो असे आहेत. सटोरियांची पकड घट्ट असल्याने सोमवारी सोने चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

देशातंर्गत तुरीच्या उत्पादनात घट झाल्याने, मागील काही दिवसांपासून तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत होता. यावर्षीच्या हंगामातील तूर आणि उडीदाचे उत्पादन हे मागील तीन वर्षातील निच्चांकी उत्पादन असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सरकारने इशारा दिल्यानंतर उत्पादन कमी असून आणि पुढील काळात तेजी दिसत असूनही उद्योग गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत.

यंदा तुरीचे उत्पादन घटले. सलग दुसऱ्या वर्षी उत्पादन कमी झालं. त्यामुळे तुरीचा पुरवठा कमी आहे. पण सरकारही निवडणुका डोळ्यांपुढे ठेऊन भाव कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. उद्योग आणि स्टॉकिस्ट तुरीचा स्टॉक करू शकत नाहीत. कारण आधीच तुरीवर स्टॉक लिमीट आहे. सरकारने बाजारभावाने खरेदीचा प्रयत्न केला. पण सरकारला जास्त तूर मिळाली नाही. जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज एक हजार पोते इतकी असून, भाव ७००० ते ११२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

निवडणुकीच्या काळात साखर आणि गव्हाचे दर वाढू नयेत म्हणून सरकारने कृषी कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर पाळत ठेवली आहे. कोणत्याही प्रकारचा साठा व्यापाऱ्यांना करता येणार नाही. सरकारने व्यापाऱ्यांसह कंपन्यांना गहू आणि साखरेचा कोटा जाहीर करण्यास सांगितले आहे. तर काही साखर कारखान्यांना प्रमाणापेक्षा जास्त साखरेची विक्री केल्यामुळे त्यांच्या साखर विक्रीच्या कोट्यात २५ टक्क्यांची कपात करण्यात आलीय.

त्याचा मोठा फटका साखर कारखानदारांना बसला आहे. त्यामुळे साखरेच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या साखरेचे दर ३७५० ते ३९०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

दूध विकून पैसे हाती येत नाही; मग हा उपाय करून बघा

बाजारभाव

गहू२४०० ते ४०००गुळ३२०० ते ३६००
ज्वारी२२०० ते ४५०० पामतेल १०४००
बाजरी२१०० ते २७०० सूर्यफूल तेल १०५०० 
मका २००० ते २२००सरकी तेल १०४००
हरभरा५००० ते ५८५० सोयाबीन तेल १०४००
सोयाबीन ३८०० ते ४५०० करडी तेल१८०००
टॅग्स :बाजारसोनंतूरशेतकरीशेती