अध्यात्म नगरी पंढरीत सध्या गुलाबाचा दर १०० ते ३०० रुपयांवर पोहोचला आहे. पंढरपुरातून मंगळवेढा, सांगोला, अकलूज, खर्डी, सोलापूर, इंदापूर, म्हसवड, दिघंची, आटपाडी, सातारा, मोहोळ, मोडनिंब या ठिकाणाहून व्यापाऱ्यांची फुलांना मागणी आहे. सध्या सर्वच फुलांचे दर तेजीत असल्याचे अडत दुकानदार पंकज देवमारे यांनी सांगितले.
तीर्थक्षेत्र पंढरपूरसारख्या पवित्र ठिकाणी देवदेवतांची अनेक मंदिरे आहेत. वारकऱ्यांना या ठिकाणी भेट देऊन अंतःकरणापासून तृप्त झाल्यासारखे वाटते. तसेच पंढरपूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शहरातील महात्मा फुले चौक येथे फुलांचा फार मोठ्या प्रमाणात बाजार भरतो.
या ठिकाणी निरनिराळ्या फुलांचा लिलाव होतो. ताजी सुंदर फुले बघून मन प्रसन्न होते. झेंडू, गुलछडी, गुलाब, मोगरा, लिली फूल, बिजली (पांढरे फुल) आदी फुलांचा मोठा बाजार भरतो.
गुलाब फूल १०० ते ३०० रुपये किलोपर्यंत, तर गुलछडी १०० ते २५० किलोपर्यंत दर गेल्याची माहिती दिली. दररोज ६० ते ७० हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत आहे. त्यामुळे सध्या गुलछडीचा भाव वाढल्याने फुल विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.