गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला आहे. बळीराजाचा महत्त्वाचा पोळा सण चार दिवसांवर येऊन ठेपल्याने रविवारी राजूरच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी सर्जा-राजाचा साजशृंगार खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
शेतकऱ्यांना वर्षभर शेतात राबवण्यासाठी मदत करणाऱ्या सर्जा- राजाचा पोळा सण चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा पावसाने तब्बल दीड महिना उघडीप दिल्याने खरिपातील पिकांना प्रचंड फटका बसला आहे. पावसाअभावी सोयाबीन मका, मूग पीक हातचे गेले आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने कपाशी पिकाला संजीवनी मिळाली आहे. रविवारी आठवडी बाजारात शेतकऱ्यांनी पोळा सणाच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.
पावसाने उघडीप दिल्याने पिकांना फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हात अखडता घेऊन पोळ्याच्या सजावटीची खरेदी केली. सजावट साहित्याच्या किमतीत यंदा दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे. यावर्षी व्यवसाय जेमतेम होता.-अजय अग्रवाल, साजशृंगार विक्रेते, राजूर.
वर्षभर शेतीत राबणाऱ्या सर्जा-राजाला गोंडे, घागरमाळा, बेगडी, हिंगुळ, मोरखी, झुले, फुगे आदी साजशृंगार खरेदी करण्यात आला. बाजारात शंभरच्या वर दुकाने थाटली होती. तसेच, पोळ्याला ग्रामदेवतेला नारळ फोडण्याची प्रथा आहे. त्यामुळे नारळ विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. १८ ते २० रुपये दराने नारळाची विक्री सुरू होती. प्रत्येक शेतकरी दहा ते पंधरा नारळ घेताना दिसून आले. दोन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर आनंद दिसत होता.