हिवाळ्यात पचनशक्ती वाढलेली असल्यामुळे या दिवसांत सुका मेवा खाण्यासाठी डॉक्टरांकडून नेहमीच सल्ला दिला जातो. हिवाळ्याच्या कालावधीत गृहिणी मेथीचे लाडू, डिंक लाडू असे पदार्थ बनविण्यात गुंतलेल्या दिसतात. मात्र खारीक, खोबरं, अंजीर, बदाम, काजू ही सुकी फळे या दिवसांत चांगलाच भाव खातात. मात्र यावर्षी ऐन हिवाळ्यात सुका मेवाचे भाव आटोक्यात आले आहेत.
३०० ते ३५० रुपये किलोने मिळणारी खारीक अडीचशे तर २७० रुपयांपर्यंत असणारे खोबरे १२० रुपयांनी विक्री होत आहे. तसेच डिंक, अंजीर, बदामाच्या भावातदेखील काही अंशी उतार झाले असल्याने यावर्षी खवय्यांना सुका मेवा खाण्याची संधी चालून आली आहे.
खोबऱ्याचे भाव १२० वर
ऑक्टोबरमध्ये खोबऱ्याचे भाव २६० ते २७० रुपयांवर गेले होते. मात्र नोव्हेंबरपासून किमतीत घट झाली असून १२० रुपये किलो दराने शहरात खोबऱ्याची विक्री होत असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले, केरळ, तामिळनाडू व गोवा या किनारपट्टी राज्यातून शहरात स्वोबयाची आवक होते. खोबऱ्याचे भाव घसरल्याने गृहिणीदेखील समाधान व्यक्त करत आहेत.
दर घटल्याने मागणी वाढली
- मागील महिन्यापासून सुका मेवा कमी भावात उपलब्ध होत असल्याने मागणीत वाढ झाली आहे.
- खसखस, डिक, शहाजीरा, लवंगाचे भावदेखील कमी झाले असल्याने मागणी वाढली आहे. दरम्यान, सुका मेवा उष्णता देणाऱ्या पदार्थात येत असल्याने हिवाळ्यात मागणी वाढते.
- परंतु यावर्षी ऐन हिवाळ्यात भाव कमी झाले असल्याने दरवर्षीच्या तुलनेत सुका मेवा ग्राहकांची संख्या वाढली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
असे आहेत दर...
खारीक 160 ते 360
खोबरं 120 ते 140
डिंक 300 ते 320
मेथी 90 ते 100
किसमिस 220 ते 400
अंजीर 800 ते 1200
काजू 720 ते 1000
बदाम 600 ते 900
पिस्ता 960 ते 1000
गोडंबी 800 ते 1100