यंदा चिंच उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. सर्वत्र चिंचेच्या झाडांना चिंचा लगडल्याचे दिसत असून, चिंचेच्या उत्पादनातून शेतकऱ्याला यंदा चांगला आर्थिक हातभार लागणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतात नैसर्गिकरीत्या उगवलेली गावराण चिंचेची पुराढ झाडे आहेत. चिंच ही सपाट जमिनीवर, शेताच्या बांधावर, डोंगरदऱ्यात, माळरानावर कुठेही उगवते. त्यामुळे चिंचेची झाडे बहुसंख्येनी आहेत.
बिना खर्च करता चिंच वृक्षापासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल चिंच लागवडीकडे जास्त प्रमाणात आहे. शेतीबरोबरच चिंचेचे अनेक पुराढवृक्ष गावोगावी आहेत. उन्हाळ्यात शेतीकामासह इतर कुठलेच छोटेमोठे काम नसल्याने महिला, ठरावीक पुरुष घरीच असतात.
मग, अशाच दिवसांत हंगामी उद्योग म्हणून चिंचांकडे पाहिले जाते. एका महिन्यापासून चिंचांचे काम सुरू असून, यातून अनेकांना रोजगार मिळत असल्याचे चित्र ओतूर परिसरात पाहायला मिळत आहे. माळशेज परिसरात गावागावांत मोठ्या प्रमाणात चिंचा आहेत.
मात्र, सध्या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने चिंचांचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. ओतूर परिसरात गेल्या एक महिन्यापासून चिंचा झोडणे, गोळा करणे, फोडणे आणि त्यानंतर बाजारात आणून विकणे या छोट्या व्यवसायाला गावोगावी प्रतिसाद मिळत आहे.
उन्हाच्या प्रहरात घरी बसून चिंचा फोडण्याचेदेखील काम अनेक जण करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. घरी रिकामे बसण्यापेक्षा दोन पैसे मिळतील व उदरनिर्वाह चालेल या आशेने चिंच काढण्याचे काम करताना नागरिक दिसत आहेत.
किलोला २५ रुपये भावएका चिचेच्या झाडाच्या चिंचा काढण्यासाठी कुठे ३ तर कुठे ५ माणसे काम करतात. ओतूर परिसरात अनेक जण चिंचेचा व्यवसाय करतात. मात्र, गेल्या वर्षांपूर्वी चिचेला १५ ते १६ रुपये किलो भाव होता. त्यावेळी अल्प भाव असल्याने काही शेतकयांनी चिचा उतरविल्या नाहीत; पण, यंदा चिंचेला २० ते २३ रुपये किलो भाव आहे. चिंचा झाडावरून खाली काढण्यासाठी, गोळा करण्यासाठी व चिंचा फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत असतो.
चिंचेच्या झाडाला पावसाचे पाणी पुरेसे होते. इतर फळबागांसारखा त्यावर कोणताही खर्च करावा लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विनाखर्च उत्पन्न मिळते. यंदा अल्पसा पाऊस झाला आहे: तरीसुद्धा चिंचांच्या ओड्याने फांद्या जमिनीकडे वाकल्या आहेत. फळधारणा जास्त झाल्यामुळे यंदा जास्त फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. - पोपट घोलप, शेतकरी