Join us

कमी आवक असल्याने बाजारात वाढली मागणी; वाचा जांभळाला किती मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:12 AM

रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभळाला यंदा चांगला दर मिळत...

रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभळाला यंदा चांगला दर मिळत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सावळदबारा शिवारात २०० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.

अनेक पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असलेले जांभूळ हे फळ मधुमेही रुग्णांसाठीही फायदेशीर व गुणकारी आहे. त्यामुळे त्याला मोठी मागणी असते. पावसाळ्याच्या प्रारंभी जांभळे बाजारात येतात. मात्र यंदा उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे.

त्यातच जंगल शिवारातील जांभळांच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे. परिणामी यंदा बाजारात जांभळे कमी प्रमाणात विक्रीला आली आहेत. त्यामुळे दरही चांगले मिळत आहेत.

पूर्वी सावळदबारा परिसरात जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जांभळाचे झाड होते. मात्र कालौघात जमिनीच्या झालेल्या वाटण्यांमुळे दिवसेंदिवस क्षेत्रफळ घटत गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधही साफ करायला सुरुवात केली. यामुळे जांभळांच्या झाडांची कत्तल झाली. त्यामुळे रानमेवा आता दुर्मीळ होत चालला आहे. त्यामुळे आज जांभूळ २०० रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होत आहे.

जांभूळ आरोग्यदायी

• जांभूळ या फळामध्ये व्हिटॅमिन सी, लोह व पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे.

• लोह हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. जांभूळ जरी मधुमेहींसाठी चांगले आहे.

• तरी जांभळात नैसर्गिक साखर असते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जांभळात फायबरही मोठ्या प्रमाणात असून दाहक विरोधी गुणधर्मही आहेत.

हेही वाचा - जांभळाची अशी आरोग्यदायी माहिती जी या आधी नसेल वाचलेली

टॅग्स :फळेबाजारशेती क्षेत्रशेतकरीशेतीमार्केट यार्डमार्केट यार्ड