रमजान व वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल १,१३६ टन कलिंगडची आवक झाली आहे.
होलसेल मार्केटमध्ये १२ ते १८ रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तसेच साडेअकराशे टन टरबूजही आले आहेत.
रमजानच्या महिन्यात कलिंगडच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. यावर्षी उन्हाळ्यामध्येच उपवास सुरू झाल्यामुळे पहिल्याच दिवशी कलिंगडला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी १९४ टन आवक झाली होती.
मंगळवारी एकाच दिवशी तब्बल १,१३६ टन आवक नोंद झाली आहे. बाजार समितीबाहेर ट्रक, टेम्पोची रांग लागली होती. मार्च ते मेअखेरपर्यंत कलिंगडची आवक मोठ्या प्रमाणात होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
मुंबई, नवी मुंबईमध्ये ग्राहकांकडून कलिंगडला पसंती मिळत असल्यामुळे राज्यातील सर्वात जास्त आवक मुंबई बाजार समितीमध्ये सुरू आहे. होलसेल बाजारात १२ ते १८ व किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
कोठून येते कलिंगड?
मुंबई बाजार समितीमध्ये कर्नाटक, गुजरात, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर परिसरातून कलिंगडची आवक आहे. शुगर किंग, दीप्तीसह चार ते पाच प्रकारच्या कलिंगडच्या वाणाची आवक होत आहे.
कलिंगडची आवक व दर (प्रतिकिलो)
बाजार समिती - आवक - बाजारभाव
मुंबई - ११३६ टन - १२ ते १८
सोलापूर - ६१ टन - ५ ते १६
पुणे - १५१ टन - १० ते १५
पुणे, मोशी - ३९ टन - १० ते ११
भुसावळ - ८ क्विंटल - ६ ते १०
राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून व कर्नाटकमधूनही कलिंगडची आवक होत आहे. मुंबई, नवी मुंबईच्या स्थानिक मार्केटसह विदेशातहीं कलिंगडला मागणी असते. संपूर्ण उन्हाळा हंगाम सुरू राहील. - शिवाजी चव्हाण, कलिंगड व्यापारी, एपीएमसी
यावर्षी उन्हाळा व रमजान सोबतच आहे. यामुळे आवक वाढली आहे. ग्राहकांचा प्रतिसादही उत्तम मिळत आहे. मेअखेरपर्यंत कलिंगडचा हंगाम सुरू राहील. - संभाजी झांबरे, व्यापारी, एपीएमसी