भोर : तालुक्याला भाताचे आगार समजले जाते. या वर्षी सुमारे ७६१० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. त्यामधून साधारण प्रति हेक्टरी ४४८० किलो ग्रॅम (चार टन) भाताचे उत्पादन झाले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी वाढ झाली असून, तांदळाच्या दर्जानुसार इंद्रायणी तांदळाला ६० ते ७० रुपये किलो इतका उच्चांकी दर मिळण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्यात खरीप हंगामात भात हे मुख्य पीक असून, शेतकऱ्यांचे मोठे अर्थकारण भात पिकावर अवलंबून आहे. पश्चिम भागातील हिौर्डशीखोरे, आंबवडे, वीसगाव, वेळवंड खोरे, भुतोंडे खोरे, महुडेखोरे या भागात मोठ्या प्रमाणात भाताचे पिक घेतले जाते.
यंदा भाताच्या सरासरी उत्पादनात किरकोळ वाढ झाली आहे. मागील वर्षी सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी ४११२ किलोग्रॅम उत्पादन होते, त्यामध्ये २९८ किलोची वाढ होऊन ४४८० किलोग्रॅम प्रति हेक्टरी उत्पादन झाले आहे.
यामध्ये सर्वात जास्त इंद्रायणी वाणाचे उत्पादन झाले असून, त्या खालोखाल फुले समृद्धी, रत्नागिरी-२४, कोलम व काही प्रमाणात आंबेमोहर भाताचे उत्पादन घेतले जाते.
भोर तालुक्यातील इंद्रायणी तांदळाने मोठी प्रसिद्धी व बाजारपेठ मिळवली असून, पुणे जिल्हासह मुंबई सातारा भागातील व्यापारी, तसेच नागरिक देखील इंद्रायणी खरेदीसाठी भोर तालुक्यातील नसरापूर या तांदळाच्या रविवारच्या बाजारात येत असतात.
मागील एक ते दोन वर्षापासून शेतकरी व त्यांची मुले सोशल मीडियाच्या माध्यामातून देखील थेट शेतकरी ते ग्राहकांपर्यंत विक्री करत आहेत, तर काही शेतकरी शहरातील ग्राहकांना थेट घरी जाऊन तांदळाची विक्री करत आहेत.
त्यामुळे नसरापूर तांदूळ बाजारावर काहीसा परिणाम झाला असला, तरी अनेक शेतकरी मात्र या बाजारात येऊनच तांदूळ विक्रीस पसंती देत असतात. या बाजारात इंद्रायणी तांदूळ भाव खाणार असून, दर्जानुसार सुमारे ६० ते ८० रुपयांपर्यंत किलोला भाव मिळण्याची शक्यता आहे.
फुले समृद्धी हे वाण देखील इंद्रायणीचेच पुढील वाण आहे. या वाणास देखील ५० ते ५५ रुपये दर मिळत आहे. रत्नागिरी २४ या वाणास ४० ते ४५ रुपये, कोलम या वाणास ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे.
तर भोर व मावळ भागाची खास ओळख असलेल्या आंबेमोहर या वाणाचे उत्पादन कमी उताऱ्यामुळे कमी प्रमाणात घेतले जाते. या आंबेमोहर वाणाला १०९ ते ११० रुपये भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
गोडाऊनची सुविधा
तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दरवर्षी नसरापूर येथे तांदूळ बाजारासाठी शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते. तसेच, शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला तांदूळ पुढील बाजारपर्यंत ठेवण्यासाठी गोडाऊनची देखील सुविधा उपलब्ध करुन दिली जात असल्याचे भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव आंबवले यांनी सांगितले.
यावर्षी शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने भात काढणीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भात लवकर मिलवर येत आहे. तसेच मिलची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे तांदूळ बाजार देखील लवकर सुरू झाला आहे. काही व्यापारी मिलवरच येऊन शेतकऱ्यांकडून तांदळाची खरेदी करत असतात, अशा वेळी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. - लहुनाना शेलार (माजी सभापती)
तालुक्यातील भात उत्पादन आधुनिक पद्धतीने होऊन उत्पादनात वाढ होण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्ये अधिक उत्पादनासाठी चारसूत्री पद्धतीने भात लावणी करणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने भात लावणी करणे, भात काढणी देखील आता यांत्रिक पद्धतीने केली जात आहे. भातावर पडणाऱ्या करपा व अन्य रोगाबाबत देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. - शरद धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी
अधिक वाचा: आले पिकाचे टप्प्यात नियोजन करून उत्पादनाचा करेक्ट कार्यक्रम करणारे शेतकरी भारत शिंदे यांची यशकथा