मागील १० दिवसांपूर्वी सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर चक्क दर ८,५०० रुपयांवर पोहोचला. त्यानंतर निर्यात शुल्क वाढीमुळे आणि आवक वाढल्याने मागील आठवड्यापासून कांद्याचा दर सहा हजारांमध्येच स्थिरावला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दररोज अडीचशे ते तीनशे ट्रक कांद्याची आवक सुरू आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते. याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागातूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो. यंदा कांदा लागवडीनंतर महिनाभरात पाऊस न झाल्याने करपू गेला. त्याचा परिणाम दरावर आणि मागणीवर झाला आहे. मागील १५-२० दिवसांपूर्वी कांद्याचा दर साडेआठ हजाराच्या वर गेला होता. त्यामुळे दिवाळीमध्ये दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, दिवाळी सणात कांद्याचा वांदा होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोलापूर बाजार समितीतील कांद्याचा दरही खाली आला.
मागील महिन्यात ३,००० ते ३,५०० रुपये दर होता. दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशीच अचानक सहा हजारांचा पल्ला गाठला. दररोज १५० ते २०० ट्रक कांद्याची आवक असताना आता सणामुळे दररोज अडीचशे ते तीनशे ट्रक आवक सुरू आहे. आता पुढील काही दिवस दर सहा हजारांच्या आतच राहणार आहे. शिवाय सरासरी दर तीन हजार ते साडेतीन हजारच्या आतच असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.
आंध्र, तामिळनाडू, तेलंगणातून मागणीसोलापुरातील कांदा आंध्रप्रदेशातील हैद्राबाद, जहिराबाद, निजामाबाद, विजयवाडा, राजमंत्री व तामिळनाडूतील चेन्नई, सेडम, कुभकोलम, पोलाची, तसेच तेलंगणातून मोठी मागणी आहे. कर्नाटकातील बंगळुरू, चित्रदुर्ग, तुमकूर, राणीबेन्नूर येथेही सोलापुरातील कांदा जात आहे. तसेच कोलकताहून मागणी वाढली आहे.
जोपर्यंत निर्यात शुल्क कमी होत नाही तोपर्यंत कांद्याचा दर आता स्थिर राहण दिवाळीनंतर नवीन माल वाढणार आहे. तोपर्यंत निर्यात शुल्क कमी न झाल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परतीच्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाल्याने जानेवारी महिन्यात आवक वाढेल, असा अंदाज आहे. - नसीर खलिफा, कांदा व्यापारी