अजित घस्ते
मार्केट यार्डबाजारात सध्या लसणाची आवक कमी होत असून, तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात ३५० रुपये प्रतिकिलो भाव असून, किरकोळ बाजारात ४०० रूपये प्रतिकिलो भावाने विक्री केली जात आहे. यामुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेर लसूण गेला असल्याने गृहिणींना लसणाची फोटणी महाग होत आहे. वाढत्या महागाईत सामान्यांच्या आवाक्याबाहेर लसूण गेला आहे.
किरकोळ बाजारात लसणाच्या दरातील तेजी कायम असून, पावशेर लसणाला शंभर रुपये मोजावे लागत आहेत. थंडी ओसरल्यानंतर नवीन लसणाचा हंगाम सुरू होणार असून, आणखी काही दिवस लसूण दरवाढीची झळ गृहिणींना सोसावी लागणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
असे आहेत भाव
घाऊक बाजारात सध्या दहा किलो लसणाला प्रतवारीनुसार, १५०० ते ३००० रुपये असे दर मिळत आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाची विक्री प्रतवारीनुसार, ३०० ते ४०० रुपये किलो दराने केली जात आहे. घाऊक बाजारात नवीन लसणाचे प्रतिकिलोचे दर प्रतवारी नुसार ३५० ते ३७० रुपयांपर्यंत आहेत.
येथून होते आवक
महाराष्ट्रातून सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर भागात लागवड केली जाते. मात्र सध्या आवक कमी होत आहे. परराज्यातून मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यातून सध्या मार्केट यार्डात लसणाची आवक होत आहे.
जुन्या लसणाचा हंगाम संपला आहे. नवीन लसणाचा हंगाम थंडी ओसरल्यानंतर सुरू होतो. मध्य प्रदेशातून सध्या दररोज नवीन लसणाची पाच ट्रक आवक होत आहे. सध्या बाजारात लसणाची तुडवडा असून, लसणाचा हंगाम पूर्णपणे सुरू झाला नाही. नवीन लसूण बाजारात दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. - जगन्नाथ यदोवते, व्यापारी, मार्केट यार्ड