सोलापूर: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला काही केले तरी शिस्त लागेना. शनिवारी नियोजनासाठी बैठक झाली. ६०० गाड्या लिलावासाठी सोडण्याचे ठरले. मात्र, केलेल्या नियोजनावर रविवारी पाणी फिरले. कारण, रविवारी सकाळपासून कांद्याच्या गाड्या आल्या, त्या गाड्यांना टोकन देऊन जनावर बाजारात लावत असतानाच दुपारी दुसऱ्या गेटने कांदा मार्केट यार्डात शिरल्या. चौकात पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कांद्याची मोठी आवक होत आहे. एक हजारांहून अधिक कांदा गाड्या येत असल्याने बाजार समितीतील नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले. मागील आठ दिवसांत बाजार समितीत जिकडे तिकडे कांदाच कांदा पाहायला मिळाला. पाच हजारांवरील दरही २००० ते २५०० रुपयांपर्यंत खाली आला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. नियोजन पूर्णपणे कोलमडले असतानाही कोणाचे लक्ष नव्हते. संचालकही लक्ष देत नव्हते. व्यापारीही काही करू शकले नाही. यावर तोडगा काढून नियोजन करण्याऐवजी एक दिवसाआठ लिलाव करण्याचा निर्णय घेतला, त्याचा उलट परिणाम झाला, कारण लिलाव बंद ठेवल्याने दोन दिवसाचा माल एका दिवसात आल्याने पुन्हा आहे तीच परिस्थिती उद्भवत होती.
सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी दुपारी व्यापारी व हमाल कर्मचाऱ्यांची बैठक घेतली, त्या बैठकीत दररोज ६०० गाड्या लिलावासाठी सोडण्याचे ठरले. बैठकीत नियोजन ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती होणे अपेक्षित होते. मात्र, शनिवार आणि रविवार दोन दिवस लिलाव बंद असल्याने सोमवारच्या लिलावासाठी रविवारी सकाळपासून गाड्या यार्डासमोर आल्या. त्या गाड्यांना जनावर बाजारात उभारायची व्यवस्था करण्यात येत होती. मात्र, दुपारनंतर बेदाणा मार्केटकडील गेटमधून गाड्या आत सोडण्यात येत होत्या. तेव्हा चौकात वाहतुकीची कोंडी झाली. सर्व गाड्या यार्डात शिरल्या. तेव्हा त्या गाड्यांना आवरण्यासाठी बाजार समितीची यंत्रणा कमी पडली आणि केलेल्या नियोजनावर पाणी फिरले.
गाड्यांमध्ये किती माल कळेनाच
कोणी ट्रकमध्ये.. कोणी ट्रॅक्टरमध्ये.. कोणी टेम्पोमध्ये तर कोणी पिकअप जीपमध्ये कांदा आणतात. त्यामुळे एका गाडीत २०० पोती आणि दुसन्या गाडीत ७० पोती कांदा राहणार आहे. त्यामुळे १ लाख २० हजार पोती बाजार समितीत आल्याने शेतकऱ्यांना कसे कळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुन्हा हजार गाड्या.. लिलाव बंद राहण्याची शक्यता
- रविवारी सायंकाळपर्यंत जवळपास ५०० हून अधिक गाड्या यार्डात होत्या. आणखी गाड्या गेटच्या बाहेर होत्या. शिवाय रात्रीही मोठ्या प्रमाणात माल येतो. त्यामुळे सोमवारीही लिलावाला एक हजारांपेक्षा अधिक गाड्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारी पुन्हा लिलाव बंद राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
- रविवारी सायंकाळी बाजार समितीच्या प्रमुख प्रवेशद्वारामधून गाड्या सोडण्यात आले. गेटवर गाड्या मोजण्यासाठी अथवा नियोजन लावण्यासाठी कर्मचारी नव्हते. त्यामुळे मेन चौकात वाहतुकीची कोंडी आल्यामुळे पोलिसही वैतागले होते.
रविवार सकाळपासून गाड्या आल्याने टोकन देऊन नियोजन करण्यात येत होते. मात्र, शेतकरी ऐकायला तयार नव्हते. पाऊस आल्यास माल खराब होईल, नुकसान झाल्यास कोण देणार, असे म्हणत गाड्या थेट यार्डात सुटल्या. एकामागून एक गाडी आत जात असल्याने थांबविणे अशक्य झाले. त्यामुळे आवक मोठी झाली आहे. - केदार उंबरजे, व्यापारी संचालक, बाजार समिती