Join us

कांद्याने केली शेतकऱ्यांची कोंडी! दर केवळ १४ रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 1:26 PM

कांदा निर्यात बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात कांदा विक्री करावा लागत आहे.

सोलापूर : अतिवृष्टीमुळे नुकसान, दुष्काळामुळे उत्पादनात घट आणि त्यात भर म्हणून केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यातबंदी आणि निर्यातशुल्कात वाढ यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला गेला आहे. सध्या नव्या कांद्याची आवक बाजारात वाढली असून मागच्या एका आठवड्यापासून कांद्याचे दर कोसळले आहेत. 

सोलापूर बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत काल कांद्याची आवक कमी झाली होती. तरीही बाजार समितीने काही गाड्या गेटबाहेर उभ्या केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळाला. त्याचबरोबर या टोकन पद्धतीला शेतकऱ्यांनी विरोध केला असून येथे कांद्याला १ हजार २०० ते १ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. 

गाडीभाडेसुद्धा परवडत नाही

काल बाजारातील आवक घटूनही दर कमीच आहेत. तर यामुळे शेतातील माल काढायला आणि मार्केटमध्ये घेऊन यायला सुद्धा परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा शेतातच ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि त्यातून कांद्याचे कोसळलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात आहे.

परराज्यात कांद्याला जास्त दर

सोलापूर बाजार समितीत दर कमी मिळत असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी कर्नाटकातील बंगळूरू येथे कांदा विक्रीसाठी नेला होता. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दुप्पट दर मिळाला आहे. सोलापुरातील काही शेतकऱ्यांनी बंगळुरूमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला २ हजार ९०० तर हलक्या प्रतीच्या कांद्याला २ हजार ६०० रूपये सरासरी दर मिळाल्याचं सांगितलं आहे. असं असतानाही महाराष्ट्रातील कांद्याचे दर कमी का असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. 

मागच्या आठवड्यात चांगला दर मिळत होता पण सध्या मार्केटमध्ये १२ ते १६ रूपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामुळे कांदा काढायला पुरतच नाहीत. शेतकऱ्यांचा खर्चही यंदा जास्त झालाय, पाणी कमी आहे. त्यातून दराची अशी बोंबाबोंब असल्यामुळे भाडेसुद्धा पुरत नाही. मागच्या एका आठवड्यापासून भाव खाली आहे. 

- सुधाकर कोरके (कांदा उत्पादक शेतकरी, पंढरपूर)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकांदामार्केट यार्ड