जिल्ह्यात 'नाफेड'कडून कांदा खरेदी करण्याबाबत अनेक तक्रारी असल्याने नाफेडने बाजार समित्यांमध्ये जाऊन कांदा खरेदी करावा, त्यामुळे व्यापाऱ्यांचा कांदा किती आणि शेतकऱ्यांचा कांदा किती खरेदी करण्यात आला, याबाबतची स्पष्टता आणि पारदर्शकता येईल, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी टंचाई आढावा बैठकीप्रसंगी दिले.
पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. २८) जिल्हाधिकारी बैठकीत कांदा प्रश्नावरही माध्यमांना माहिती दिली. शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यात 'नाफेड' मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु 'नाफेड'मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांदा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी होत आहेत. शासनाच्या आदेशानंतर 'नाफेड'ने जिल्ह्यात साडेतीन हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. मात्र, किती शेतकऱ्यांकडून घेतला. व्यापाऱ्यांकडून घेतलेला कांदा किती? शेतकऱ्यांकडून घेतलेला कांदा किती याबाबत पारदर्शकता असावी, असे निर्देश 'नाफेड'ला दिले जातील, असेही भुसे यांनी सांगितले.
मार्केट कमिटीमधून त्यांच्या निकषानुसार कांदा उपलब्ध होत असेल तर नाफेडने कांदा मार्केटमध्ये जाऊन कांदा खरेदी करणे अपेक्षित असल्याने तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. नाफेडचे अधिकारी प्रत्यक्षात खरेदी प्रक्रियेत नसतात फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जातो.. परंतु याबाबतची पारदर्शकता अपेक्षित आहे. नाफेडने याबाबतची माहिती उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षाही पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव नियमित सुरू झाले आहेत. सोमवारी १ लाख ७३ मेट्रिक टन कांद्याची आवक झाली तर ५६० ते २३१४ रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळाला, अशी माहितीही त्यांनी दिली. शेतकऱ्यांकडे किती कांदा शिल्लक आहे, किती भागात रोपे तयार आहेत, याची आकडेवारी कृषी विभागाकडून घेतली जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले,
पिके संकटात; परतीच्या पावसावर भरवसा
जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत ६७२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मागीलवर्षी आतापर्यंत ८७१ मिमी इतका पाऊस झाला होता तर आतापर्यंत ३८० मिमी पाऊस झालेला आहे. मागील वर्षीपेक्षा ५६ टक्के इतकाच पाऊस झालेला आहे. आता परतीच्या पावसावरच भरवसा असून, मागील तीन वर्षांचा अनुभव लक्षात घेता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाया पावसावर पिण्याच्या आणि सिंचनाचा प्रश्न अवलंबून असतो. शिवाय रब्बी हंगामालाही मदत होते, असे भुसे यांनी सांगितले.
शहरासाठी पाणी आरक्षित
नाशिक महापालिकेसाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त नियोजन असल्याने सध्या तरी महापालिकेच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गंगापूर धरण समूहात ६ हजार ५१० दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये महापालिकेसाठी ४५०० दलघफू पाण्याची मागणी आहे. त्यामुळे नाशिक शहरावरील पाणी कपातीचे संकट टळले आहे. मात्र, इतर धरणांत पाणीसाठा कमी असल्याने या प्रकल्पांची स्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.
शेतकऱ्यांच्या भावना तीव्र; गांभीर्याने घ्या
जिल्ह्यात पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. कांद्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला असल्याने शेतकयांच्या भावना तीव्र आहेत. पीकविमा कंपन्यांनी पिकांचा पंचनामा करताना सरसकट पंचनामे करावेत. सर्व्हे करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करता कामा नये, अशी तक्रार आल्यास विमा कंपन्यांबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असा इशाराही दिला.