Iranian Apple Market : हिमाचल व काश्मिरी सफरचंदांचा यंदा मनसोक्त आस्वाद घेतला नंतर आता बाजारात 'इराणी' सफरचंद दाखल झाले आहेत. लालसर, चकचकीत रंगातील हे सफरचंद चवीलाही तुरट-गोड आहे.
१४० रुपयांत किलोभर सफरचंदे येत असल्याने दिवसभरात शहरात एक टन सफरचंदे विकली जात आहेत. इराण- इस्राइलमध्ये युद्धामुळे तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत इराणमधून भारतात सफरचंदांची मोठ्या प्रमाणात आयात झाली आहे.
मुंबईतून सफरचंदांचे ट्रक छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ अडत बाजारात आणले जात आहेत.
सफरचंदांना नापसंती
• बाजारात अफगाणी सफरचंदेही मोठ्या प्रमाणात आली होती. मात्र, लाल- पिवळ्या रंगातील, वरून टवटवीत दिसणारे हे सफरचंद कापल्यावर आतून खराब निघत होते. भाव १०० रुपये किलो होता; पण खराब निघत असल्याने त्याला ग्राहकांची पसंती मिळाली नाही.
हृदयविकार, मधुमेहावर गुणकारी
निरोगी जीवनासाठी दररोज एक सफरचंद खा, असे म्हटले जाते. सफरचंदात ९५ केसीएएल कॅलरीज, २५ ग्रॅम कार्बोहायड्रेट व ४.५ ग्रॅम फायबर असते. सफरचंद खाण्याचे खुप फायदे आहेत. वजन कमी होण्यास मदत होते. मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात राहतो; तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो, असे डॉक्टर सांगतात.
जिकडेतिकडे इराणी सफरचंद
• यंदा हिमाचल व काश्मिरी सफरचंदांची विक्रमी आवक झाली. १०० रुपये किलो दर होता.
• गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात सर्वाधिक सफरचंदांची विक्री झाली.
• आता देशी सफरचंदांचा हंगाम संपत येऊन विदेशी सफरचंदे बाजारात दाखल झाली आहेत. यात 'इराणी' सफरचंदांनी यंदा बाजी मारली आहे.
मार्चपर्यंत विदेशी सफरचंदांचा हंगाम
डिसेंबरपासून विदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्च महिन्यापर्यंत हंगाम असेल. इराण, टर्की, न्यूझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आदी देशांतून सफरचंद आयात होते. - शेख अल्ताफ, इराणी सफरचंद विक्रेता