हिवाळ्यात हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली आहे. मात्र, हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव मिळत असल्याने जाफराबाद तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मिरचीची बाजारपेठ म्हणून जाफरबादची ओळख असली तरीही हजारांची फवारणी आणि तोडण्यासाठी प्रतिकिलो ५ ते ७ रुपये खर्च येत आहे. बाजारात सुरुवातीला ३० ते ४० रुपये किलोपर्यंतच्या दर मिळत होता.
आता प्रतिकिलो २० ते २५ दर मिळत आहे. त्यामुळे मिरचीचे उत्पादन घेणे परवडत नसल्याचे काही शेतकरी सांगत आहेत, तर दुसरीकडे कांदा, टमाटा दरातही अचानक घट झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
सरकारने करावी मदत
भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. राजकीय भाष्य करणारे नेते शेती मालाच्या भावावर का बोलत नाहीत, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आता निर्माण झाला आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकरी अमोल फदाट यांनी केली आहे.