कुंदन पाटील, जळगाव
किमान रासायनिक घटकांच्या अवशेष पातळीमुळे (एमआरएल) युरोपियन व आखाती देशांतील खवय्ये जळगावच्या भेंडीच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे दरवर्षांच्या हंगामात मुंबई पोर्टवरून जळगावची ५ हजार क्विंटल भेंडी रवाना होत आहे. राज्यात अव्वल ठरलेल्या जळगावपाठोपाठ ठाणे, पुणे, सातारा, अहमदनगर, धुळे आणि नाशिक जिल्ह्यातून तीन हजार क्विंटल भेंडी निर्यात होत आहे.
जळगाव जिल्ह्यात धरणगाव, एरंडोल, पारोळा तालुक्यांत सर्वाधिक भेंडीचे उत्पादन घेतले जाते. धरणगाव तालुक्यातील भेंडी मात्र निर्यातीत आघाडीवर आहे. जैविकसह रासायनिक मात्रा मर्यादेत आढळून येत असल्याने केंद्र शासनाच्या 'अॅपेडा' या संस्थेच्या माध्यमातून जळगावची सर्वाधिक भेंडी निर्यात होते. पुणे, वाशी, अहमदनगर, नाशिक येथील निर्यातदार कंपन्यांकरवी ही भेंडी निर्यात होते.
दररोज २५ गाड्या होतात रवानाधरणगाव, पारोळा, एरंडोल, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातून वाशी मार्केटला दररोज २५ वाहनांमधून भेंडी रवाना होते. चाळीसगाव तालुक्यातील आणि कजगाव परिसरातील काही गावांमधील भेंडी विदेशातही जाते. सारांश, सिंघम, राधिक, रिचसीडसह गावरान वाणांची लागवड जिल्ह्यात होते. लागवडीसाठी अत्याधुनिक पद्धत हाताळली जात असून, नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाढ करण्याचा प्रयत्न उत्पादकांकडून सुरु आहे.
या देशांमध्ये निर्यात. युरोपियन, आखाती देश, दुबई
वैशिष्ट्य काय?४ ते ६ इंच लांबीची आणि गडद हिरवा रंग असलेली भेंडी जिल्ह्यात उत्पादित होते. तसेच या भेंडीवर मोठ्या प्रमाणावर लव असते. त्यामुळे स्वाद पेरण्यातही ही भेंडी उजवी ठरते. युरोपियन देश ५ ते ६ इंच लांबीच्या आणि १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानात निर्यात झालेल्या भेंडीला प्राधान्य देतात. आखाती देश ३.५ ते ५ इंच भेंडीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी करतात.
सध्या तेजी■ सध्या भेंडी बाजारात तेजी आहे. तीन ते चार हजार रुपये प्रति क्चिटलचा भाव सुरु आहे.■ किरकोळ बाजारात मात्र ६० ते ७० रुपये प्रतिकिलोने भेंडी विक्री होत आहे.
पाक, नेपाळ उपेक्षितगेल्या दोन वर्षांपासून १ पाकिस्त नेपाळमध्ये भेंडीची निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे पाक व नेपाळी खवय्यांपासून महाराष्ट्राच्या भेंडी दूर गेली आहे.
महिनावार निर्यात करणारे जिल्हेऑगस्ट ते डिसेंबर-जळगाव, धुळे, नाशिक एप्रिल ते जून -सातारा, पुणेडिसेंबर ते फेब्रुवारी- ठाणे, पालघरनिर्यातीपूर्वी नाशिक, पुण्यातील प्रयोगशाळेत भेंडीतील रासायनिक अवशेष पातळी तपासतात.
जिल्ह्यातील सुमारे ७०० एकरांवर क्षेत्रातील भेंडी देशात आणि परदेशात रवाना होते. युरोपियन आणि आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणावर जळगावच्या भेंडीची मागणी होते.- युवराज पाटील, भेंडी उत्पादक
भेंडी लागवडीची योग्य पद्धत, वातावरणात समतोल साधण्याची किमया आणि मेहनतीच्या जोरावर राज्यात सर्वाधिक भेंडीचे उत्पादन जळगाव जिल्ह्यात घेतले जात आहे.-प्रा. किरण जाधव, शास्त्रज्ञ, उद्यान - विद्या, म. फुले कृषी विद्यापीठ, जळगाव केंद्र