दुष्काळी परिस्थिती व डाळिंबावरील तेल्या रोगाच्या प्रादुर्भावाचा यशस्वी सामना करत येथील बाबाजी नागू मोरे व त्यांचे बंधूने निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले असून त्यांच्या लालबुंद डाळिंबाला नाशिक येथील के. डी. चौधरी डाळिंब मार्केटमध्ये २० किलोच्या कॅरटला सर्वाधिक ३ हजार १ रुपये, म्हणजे प्रती किलो १५० रुपये बाजारभाव मिळाला. त्यामुळे मार्केटचे संचालक चौधरी यांनी बाबाजी मोरे यांचा चांदीचे नाणे देऊन गौरव केला आहे.
वडिलोपार्जित शेतीत पाण्याचे दुर्भिक्ष असताना मोरे बंधूंनी पाच एकरावर आरक्ता शेंदरी (भगवा) जातीच्या डाळिंबाची लागवड केली. त्यांनी बाग फुलविताना आधुनिकतेची कास धरली आहे. पाण्याच्या समस्येवर तोडगा म्हणून शेततळे बांधले. तसेच उन्हाळ्यात वेळप्रसंगी टँकरने पाणीपुरवठा केला. बहुतांशी कामे आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केली पाणी व्यवस्थापन, वेळच्या वेळी फवारणी व बागेची योग्य काळजी घेत डाळिंबाची बाग फुलविली. आंबे बहारातील डाळिंब काढणीस सध्या सुरुवात झाली आहे. सर्व माल निर्यातक्षम व उत्तम गुणवत्तेचा निर्माण झाला आहे. ४०० ते ६०० ग्रॅमचे फळ आहे. चमक व गडद रंगामुळे फळाची आकर्षकता वाढली आहे. परिसरात डाळींबाचे अत्यल्प क्षेत्र आहे. दुष्काळी परिस्थितीत मोरेंच्या डाळिंब बागेची सर्वत्र चर्चा होत आहे.
वडिलोपार्जित शेतीत आम्ही यापूर्वी बाजरी, ज्वारी, कांदा, गहू, हरभरा, मका आदी पिके घेऊन बघितली. पण पाहिजे तसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पाच एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली. उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करुन बाग वाचवली, त्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे मोठं आव्हान होतं. यावर मार्ग काढत योग्य नियोजन केल्याने प्रथमतःच डाळिंबातून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. - बाबाजी मोरे, डाळिंब उत्पादक शेतकरी, जळगाव निंबायती