यंदा जांभूळ उशिराने बाजारात दाखल झाले आहे. त्यामुळे त्याने यंदा हापूसपेक्षा चांगला भाव खाल्ल्याचे दिसत आहे. ठाण्यातील किरकोळ बाजारपेठेत ४०० ते ५०० रुपये अर्धा किलो दराने जांभळे मिळत असल्याचे चित्र आहे.
त्यातही मागील वर्षी होलसेल बाजारात ५०० रुपयांना दोन किलो जांभळे मिळत असताना यंदा मात्र त्यात केवळ १ ते अर्धा किलोच जांभळे मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जांभळापेक्षा हापूस खाल्लेलाच बरा, अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. जांभळाचा उपयोग औषधी असल्याने मागणी वाढली आहे.
का वाढले दर?
• यंदा एप्रिल आणि मे या दोन महिन्यात प्रचड प्रमाणात हीट वाढली होती. त्यामुळे जांभळाला मोहरही उशिराने आला.
• त्यानंतर आता जून महिन्यात जांभूळ मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळेच जांभळाचे दर वाढल्याचे दिसून आले.
• वास्तविक एप्रिलपासून जांभूळ बाजारात येत असतात, यंदा मात्र दोन महिना उशीर झाल्यानेच भाव वाढल्याचे व्यापारी सांगतात.
जांभूळ ८०० रुपये किलोने विक्री
तीन प्रकारचे जांभूळ ठाण्यातील बाजारात उपलब्ध आहेत. त्यातही छोट्या आकारचे जांभूळ ४०० ते ५०० रुपये किलो, मध्यम आकाराचे ६०० आणि मोठ्या आकाराचे जांभूळ थेट ८०० रुपयांहून अधिकचा भाव खाऊन जात आहे. त्यामुळे जांभळाचा भाव चांगलाच वधारला आहे.
शेजारच्या जिल्ह्यातून होते आवक
• पालघर हा जांभळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातही याच पालघर जिल्ह्यातून जांभळा आवक होत आहे.
• जागेवरच जांभूळ महाग मिळत असल्याने त्याचा फटका बसत असून ठाण्यात त्याचे भाव अधिक आहे.
गतवर्षीपेक्षा दुप्पट भाव
मागील वर्षी जांभूळ वेळेत बाजारात दाखल झाला होता. त्यामुळे त्याचे दरही स्थिर होते. मागील वर्षी जागेवर दोन किलोसाठी ५०० रुपये मोजावे लागत होते. यंदा मात्र जागेवर त्यात केवळ एक किलोच जांभूळ मिळत आहेत, तर किरकोळ बाजारातही जांभळाची आवक म्हणावी तशी न झाल्याने ४०० ते ५०० रुपये अर्धा किलोने मोठ्या आकाराचे जांभूळ विकले जात आहे.
हवामानाचा फटका जांभळाला बसला आहे. यंदा दोन महिने प्रचड ऊन पडल्याने त्याचा परिणाम जांभळावर झाला आहे. त्यामुळेच दर वाढल्याचे दिसत आहे. - अभिजीत पाटील, व्यापारी