जत तालुक्यात दुष्काळी स्थितीने उद्ध्वस्त झालेल्या द्राक्षबागा, बेदाणा दरातील घसरण, डाळिंबावर बिब्या, मर, पिन बेरर रोगांचा! प्रादुर्भाव तसेच बाजारात शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे संकटातून बहरलेल्या केशर डाळिंबाला ११० ते ११५ रुपये प्रतिकिलो दर मिळला आहे. 'द्राक्षबागांनी घालवले; पण शेतकऱ्यांना डाळिंबांनी तारले' असे चित्र जत पूर्व भागात दिसत आहे.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब बागा उजाड माळरानावर फुलविल्या आहेत. केशर जातीच्या बागा अधिक आहेत.
बंगळुरु, कानपूर, विजयवाडा येथून मागणी
सध्या बाजारात डाळिंबाची आवक कमी आहे. जागेवर येऊन व्यापारी माल खरेदी करीत आहेत. बंगळुरु, कानपूर, विजयवाडा येथे चांगला दर मिळत आहे. शेतकरी स्वतः सोलापूर, सांगली, जत, मंगळवेढा, सांगोला आदी ठिकाणी बाजार समितीच्या सौद्यात माल पाठवित आहेत.
यंदाचा उच्चांकी दर
सोन्याळ (ता. जत) येथील धरेप्पा सायबण्णा मुचंडी यांच्या केशर डाळिंबाची सांगोला (जि.सोलापूर) येथील व्यापाऱ्यांनी ११२ रुपये १ किलो दराने जागेवर येऊन खरेदी केली आहे. या वर्षातील डाळिंबाचा हा उच्चांकी दर आहे.
११ हजारांवर एकरात लागवड
तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ आहे. संख, दरीबडची सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी येथील शेतकऱ्यांनी टँकरने पाणी देऊन बागा जगवल्या आहेत. जून महिन्यात पावसाचा खंड पडला होता. फुलकळी जास्त निघाली नाही. ऑगस्ट महिन्यात ढगाळ वातावरण, रिमझिम पावसामुळे बिया, बुरशी, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला. बागांचे नुकसान झाले होते.
तीन वर्षांत ५ हजार हेक्टरवर नुकसान
डाळिंबावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या तीन वर्षांत मर रोगाने पाच हजार हेक्टर क्षेत्रावरील बागा वाळून गेल्या आहेत. दरीबडची, सोन्याळ येथील ५० टक्के बागा मर रोगाने गेल्या आहेत.
डाळिंबाचे दर (प्रतिकिलो)
डाळिंब सध्याचा दर महिन्यापूर्वी दर
केशर ११० ते ११५ ६० ते ७०
गणेश ६० ते ७० ३० ते ४०
सध्या डाळिंबाला सर्वच बाजारपेठांत चांगला दर मिळत आहे. व्यापारी जागेवर येऊन किलोवर माल खरेदी करीत आहेत. त्यामुळे दुष्काळी संकटात चांगला आधार मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीस हातभार लागणार आहे. - धरेप्पा सायबण्णा मुचंडी, डाळिंब उत्पादक, सोन्याळ