सांगली : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती.
मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विक्री शिल्लक आहे. त्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली होती.
राज्य सरकारने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून ज्वारी खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळून आर्थिक फायदा होणार आहे.
पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत भरडधान्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. राज्यामध्ये आता पणन महासंघासह आदिवासी विकास महामंडळदेखील हमीभावावर ज्वारी खरेदी करत आहे.
केंद्र शासनाने राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये मका, ज्वारी हे भरडधान्य खरेदीच्या उद्दिष्टाला मंजुरी दिली आहे. ही मुदत ऑगस्टअखेर होती.
मात्र अद्याप ज्वारी शिल्लक असल्याने मुदतवाढीचा पाठपुरावा पणन महासंघाद्वारे केला होता. त्यानुसार दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.