संदीप आडनाईक
कोल्हापूर : पांढरे सोने म्हणून हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाची परदेशातून होणारी आयात ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भारतात काजूचे दर आभाळाला भिडले आहेत. किलोला सरासरी २०० रुपयांनी दर वाढले आहेत.
यंदा हवामान बदलाचाही मोठा फटका या पिकाला बसल्यामुळे स्थानिक उत्पादनातही मोठी घट आहे. उत्पादन आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने, एकीकडे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच उद्योग अडचणीत येत आहे.
दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रथम दर्जाच्या शुभ्र रंगांच्या काजूची आयात बंद झाली आहे. स्थानिक पातळीवर कारखान्यांच्या संख्येत वाढ केल्याने काजू बाहेर पाठविण्यास त्या देशाने बंदी घातली आहे. याचा परिणाम या ठिकाणाहून येणाऱ्या काजू मालावर अवलंबन असणाऱ्या देशात काजूचा तुटवडा निर्माण झाला आहे.
भारतात काजूचे ४० टक्के उत्पादन होते. एक ते दोन महिनेच पुरतील, इतका काजू उपलब्ध असल्याने व्यापारी त्यांचा साठा करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काजूचे दर आभाळाला भिडले आहेत. जगामध्ये भारताचा काजू लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो जागतिक काजू अर्थव्यवस्थेत तो महत्त्वाचा घटक आहे.
काजूचे क्षेत्र (लाख हेक्टर मध्ये)
भारत ५.७०
महाराष्ट्र १.६०
काजूचे दर
वेंगुर्ला १०५०
गावठी ९४०
काजू बोंडनिर्मिती ६०%
वार्षिक उलाढाल २०० कोटी
काजू उत्पादन ०३ लाख टन