केडगाव : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातीलकांदा मार्केटमध्ये शनिवारी (दि. १४) उच्च प्रतीच्या गावरान कांद्याला तब्बल ५५ रुपये किलोचा भाव मिळाला आहे.
गेल्या अनेक दिवसांतील हा उच्चांकी भाव असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ऐन गणेशोत्सवात एकप्रकारे गणरायाचा पावला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत आहे. अनेक लिलावात कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जात आहे.
गुरुवारी (दि. १२) झालेल्या लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला ४३ ते ४५ रुपये किलोचा भाव मिळाला होता. शनिवारच्या (दि. १४) लिलावासाठी नेप्ती कांदा मार्केटमध्ये २५१ गाड्यांमधून ५० हजार २३२ कांदा गोण्यांची (२७ हजार ६२७ क्विंटल) आवक झाली.
लिलाव सुरू झाल्यानंतर उपबाजार आवारातील आडतदार ढाकणे ब्रदर्स यांच्या आडतीवर प्रथम प्रतीच्या १८ गोण्या कांद्याला उच्चांकी ५५ रुपये किलो (५ हजार ५०० प्रती क्विंटल) भाव मिळाला, तर २० गोण्यांना ५४ रुपये, ७ गोण्यांना ५३ रुपये भाव मिळाला.
इतर लिलावात प्रथम प्रतीच्या कांद्याला ४५ ते ५२ रुपये, द्वितीय प्रतीला ३७ ते ४५ रुपये, तृतीय प्रतीला २७ ते ३७ रुपये, तर चतुर्थ प्रतीच्या कांद्याला १५ ते २७ रुपये प्रति किलो भाव मिळाला आहे.
कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा नेप्ती मार्केटमध्ये विक्रीला आणावा, असे आवाहन नगर बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सचिव अभय भिसे यांनी केले.
घोडेगावलाही कांदा पाच हजारांच्या वर• नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपआवारात कांद्याच्या भावामध्ये शनिवारी प्रतिक्विंटल पाचशे ते सातशे रुपयांची वाढ होऊन पाच हजार दोनशे रुपयांवर पोहोचला.• सरासरी चार हजार सातशे ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.